गुढीपाडवा म्हणजेच “नवचैतन्याची व नवसंकल्पनेची” सुरूवात…
फाल्गुन महिना म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा महिना व यात होळी/धुलीवंदन म्हणजे जुन्या वर्षीचा शेवटचा सण साजरा करून संपणाऱ्या वर्षाला निरोप दिला जातो व नवीन वर्षाच स्वागत केले जाते.फाल्गुन नंतर चैत्र महिना लागतो हा महिना म्हणजे मराठी माणसासाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच नवचैतन्य. हिंदु धर्मासाठी व मराठी माणसांसाठी गुढीपाडवा अत्यंत महत्वाचा सण म्हणुन साजरा केला जातो.गुढीपाडव्याचे संपूर्ण शुभ संकेत पुरातन काळापासून आपल्याला पहायला मिळतात. कारण गुढी हे समृध्दी, मांगल्य, चैतन्य व विजयाचे प्रतिक आहे. हिंदू दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला “गुढीपाडवा” सण साजरा करतो. आपल्या दाराशी गुढी उभारून समाजाला व जगाला विजयाचे आणि समृद्धीचे प्रतिक दर्शविण्यात येते.
गुढी म्हणजे उत्सवाचे मोठे प्रतिकच! कारण याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून त्याच्या छळापासुन प्रजेला मुक्त केले. त्याचप्रमाणे रामाने असुरी शक्तीचा नायनाट केला. याच दिवशी प्रभूरामचंद्रांचा वनवास संपला होता म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा दिवस मानण्यात येतो. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली हाच तो पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून याच दिवशी शंकासुरचा वध केला.चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरूवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका सुध्दा आहे. अशा प्रकारे पुरातन काळापासून आजपर्यंत विजयी दिवस म्हणून गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी घरा-घरामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने गुढी उभारताना चांदीच्या किंवा तांब्याच्या किंवा पितळीचा लोटा, गोडवा निर्माण व्हावा म्हणून गाठी, शांतीच प्रतीक म्हणून आंब्याची डाहळी,कडु निंबाची डहाळी औषधीचे प्रतिक म्हणून, गुढीमध्ये नवे कापड इत्यादींच्या माध्यमातून गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला जातो.
या मागचा एकच उद्देश असतो की सर्वांचे आरोग्य सुदृढ रहावे, नवचैतन्य निर्माण व्हावे आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून सर्वांनीच प्रगतीचा उच्चांक गाठावा व आरोग्य सुदृढ आणि निरोगी रहावे. या दिवसाला प्रत्येक जन आपल्या दारामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधून व दारासमोर रांगोळी काढून नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. गुढीपाडवा आपण नववर्षाच्या उद्देशाने साजरा करतो. कारण येणारे दिवस सुखसमाधानाचे, सुखसमृद्धीचे जावो आणि येणारी पीढा व दु:ख दुर व्हावे हाच यामागचा खरा उद्देश आहे. आपल्या मनातील स्वार्थीपणाची वृत्ती नष्ट होवून नवीन वर्षापासून आपले मन शांत, स्थीर व सात्त्विक बनविण्यासाठी सर्वांनीच संकल्प केला पाहिजे. हाच खरा विजयी दिवस व गुढी उभारने हे खऱ्या अर्थाने विजयाचे प्रतिक व सार्थक समजण्यात येईल. चैत्राची सुरूवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. याच दिवसांपासून रामाचे नवरात्र सुरू होते व ते रामनवमीला संपते. या दिवसाला इतके महत्त्व आहे की हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आपण ज्याप्रमाणे १५ ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला प्रत्येक घरावर गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात घराघरातुन साजरी केली जाते व आनंदोत्सव साजरा केला जातो.त्याचप्रमाणे आल्हाददायक वसंत ऋतू नंतरचा उन्हाळा बाधू नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच कडूनिंबाचे पाणे खावीत असे आयुर्वेद शास्त्र सांगतो. गुढीपाडवा विविध राज्यांत वेगवेगळ्या नावांनी साजरा केल्या जातो.गुढीपाडवा हा फक्त धार्मिक, सांस्कृतिक गोष्टींनीच जोडलेला नसुन त्यात निसर्गाचा व पर्यावरणाचा सूध्दा विचार केल्याचे दिसून येते. गुढीपाडव्याच्या दिवसाला मी हेच सांगु इच्छितो की प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घेवून पुढील वाटचाल करावी. मराठी नववर्ष जगावेगळे असल्याचे आपल्याला दीसुन येते.
इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला जगभर दिखावा दाखवून जल्लोष साजरा करण्यात येतो. परंतु मराठी नववर्ष संय्यमतेने, आनंदाने, आदरतीथ्याने, प्रेमाने, मानसन्माने आणि मुख्यत्वे करून आरोग्याचा दृष्टीकोन सामोरं ठेवुन साजरा करण्यात येतो. त्यामुळे जगाचे नववर्ष व महाराष्ट्राचे नववर्ष यात जमिन आसमानचा फरक दिसून येतो. वाढते प्रदूषण व एच3 एन2 विषाणूचा प्रादुर्भाव पहाता सर्वांनीच मास्कचा वापर करावा व आरोग्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रासह भारतात वाढते प्रदूषण पहाता मराठी नववर्षाच्या निमित्ताने प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावलेच पाहिजे. यामुळे प्रदूषणावर मात करण्यास मोठी मदत होईल. गुढीपाडव्याला प्रत्येकांनी वृक्षारोपण केले तर एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल.
यामुळे गुरांना चारा, पशु-पक्षांना सावली, मानवाला शुद्ध हवा आणि सर्वांना शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.यामुळे संपूर्ण निसर्ग प्रफुल्लित होईल. यातच आपल्याला खरा गुढीपाडव्याचा व नवीन वर्षाचा विजयत्सोव व आनंदोत्सव दिसून येईल. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! .