माखजन व सरंद येथील चर्मकार समाजाच्या संत रोहिदास समाजमंदिरात चर्मकार समाजासोबत बौद्ध समाज एकत्र
आज 14 एप्रिल 2023 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती देशभर साजरी झाली. ठिकठिकाणी लोकांनी मोठ्या उत्सवात जयंती साजरी करत महामानवास अभिवादन केले. मौजे माखजन ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे सहयोग विकास मंडळाच्या (चर्मकार समाज संघटना,माखजन-सरंद) विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक ऐतिहासिक घटना घडली. माखजन व सरंद येथील चर्मकार समाजाच्या संत रोहिदास समाजमंदिरात चर्मकार समाजासोबत बौद्ध समाज एकत्र येत खूप आनंददायी वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
सोबतच दोन्ही समाजांनी 15 व्या शतकातील जातियतेविरुद्ध लढलेल्या संत रोहिदास महाराजांनाही अभिवादन केले. मान. सरपंच सोनल जाधव मॅडम, आयु. राजेश जाधव तसेच सहयोग विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रभाकर आंबवकर, श्री. संदीप आंबवकर, श्री. गणेश सरणकर, श्री. नितीन आंबवकर, श्री. सुरेश आंबवकर, श्री. गोपाळ आंबवकर, श्री. संतोष सावर्डेकर इ. सर्वजण यासमयी उपस्थित होते. श्री. संदीप आंबवकर यांनी दोन्ही समाज हे एकच असून आपल्याला अशाच रीतीने एकजूटीने राहत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पूढे घेऊन जायचे आहेत हे सांगितले. सोबतच माखजन व सरंद या दोन्ही ग्रामपंचायतीतही चर्मकार व बौद्ध समाजाने एकत्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
देशात वाढत चाललेल्या जातीयतेच्या वातावरणात हे दोन्ही समाज एकत्र येणे काळाची गरज आहे. माखजन व सरंद येथील चर्मकार समाज व बौद्ध समाज यांनी सर्वांसमोर एक चांगला आदर्श घालून दिला.