कोल्हापूर:- कोल्हापूर चित्रनगरी प्रशासनाने महसूल वाढीच्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने चित्रनगरीच्या एकूण 78 एकर क्षेत्रफळामध्ये 150 x 100 फूट आकाराचा मॅजिक स्टुडिओ, चित्रिकरणाकरिता एक एकर क्षेत्रफळाचे मोकळे भूखंड, चित्रिकरण स्थळे, पर्यटन स्थळे, 20 खोल्यांची 2 वसतीगृहे यांचा समावेश करून चित्रनगरीचा सर्वांगीण विकासाचा बृहत आराखडा तयार करुन त्वरित सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले.
प्रधान सचिव खारगे यांनी कोल्हापूर चित्रनगरी येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापुरकर, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे आणि वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर उपस्थित होते.
यावेळी श्री. खारगे यांनी चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या विविध चित्रिकरण स्थळांना तसेच कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सद्या सुरु असलेल्या “संत गजानन शेगाविचे ” आणि ” सुंदरी ” या सन टि.व्ही. वरुन प्रसारीत होणाऱ्या दैनंदिन मराठी मालिकांच्या सेटवर भेट दिली. त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरीमध्ये नव्याने तयार करावयाच्या वाडा, चाळ, मंदिर, 100×90 फूट आकाराचा स्टुडिओ, वसतीगृह, रेल्वे स्थानक, बंगला या प्रस्तावित चित्रिकरण स्थळांचा आढावा घेऊन त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.