शासन आपल्या दारी साठी तब्बल ७५० एस. टी. बसेस धावणार…
कोल्हापूर – शासन आपल्या दारी उपक्रमासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, यात आज महत्वाची जबाबदारी राज्य परिवहन मंडळ पार पाडणार आहे. कोल्हापूर येथे होत असलेला हा राज्यातील सर्वात मोठा कार्यक्रम असून शासन आपल्या दारी उपक्रमासाठी लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी तब्बल ७५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अशा सार्वजनिक या शासकीय कार्यक्रमासाठी प्रथमच इतक्या बसेसची सोय कोल्हापुरातून करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
शासन आपल्या दारी हा उपक्रम 13 जून रोजी पार पडत आहे. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा गेल्या आठ दिवसापासून कामाला लागली आहे. या परिस्थितीवर पालकमंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे लक्ष ठेवून आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. हा कार्यक्रम सर्वांचा आहे व लोक चळवळ म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आव्हान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. तर कोणाचीही गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे आव्हान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथून राज्य परिवहन महामंडळ देखील सज्ज झाले असून तब्बल 720 पेक्षा अधिक एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थींना लाभ व्हावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेतर्फे विशेष नियोजन करण्यात येत असले तरी राज्य परिवहन मंडळ यामध्ये आघाडीवर आहे. लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या एसटी आगारातून सर्व एसटी बसेस सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळपासून लाभार्थ्यांना आणन्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. या सर्व एसटी बसेस कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये रवाना झाले असून त्या त्या ठिकाणचे तहसीलदार आणि आगार प्रमुख हे लाभार्थ्यांना पाठवण्याची व्यवस्था करणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
शासनाचा हा मोठा उपक्रम असून यामध्ये राज्य परिवहन मंडळातर्फे इतक्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस सोडण्याची ही पहिलीच वेळ असावी, लाभार्थ्यांना ने आण करण्याची एक मोठी जबाबदारी आमचा विभाग पेलत आहे असे अनघा बारटक्के यांनी सांगितले. कोल्हापूर विभाग 350, सांगली 100,सातारा 30, रत्नागिरी 100, सोलापूर 50, तर सिंधुदुर्ग मधून 70 st बसेस मागविण्यात आल्या आहे. हा उपक्रम पार पाडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला सर्वसाधारण दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, आणि या खर्चाची सर्वस्वी जबाबदारी शासनाकडे असून ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी प्राप्त झाले नंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच एसटीचे पार्किंग करण्यासाठी प्रशासनातर्फे पार्किंगची देखील सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान लाभार्थ्यांची व्यवस्था करताना सोमवारी आणि मंगळवारी भारमन कमी असलेल्या काही एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे काही प्रमाणात एसटी प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र आगारांमध्ये दिसत होते.