“जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची” अंतर्गत अभियान
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्वतःचे घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकूल योजना (ग्रामीण व शहरी क्षेत्र) अशी वैयक्तिक घरकुलाची योजना राबविण्यात येते. “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची” अंतर्गत हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
सन २०२३-२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेला जातीचा दाखला, महाराष्ट्र अधिवास दाखला, वार्षिक उत्पन्न ग्रामीण विभाग १.२० लाख व शहरी विभाग ३ लाख पर्यंत मर्यादित असलेला दाखला, रेशनकार्ड, अर्जदार यांच्या नावे ग्रामीण करीता २६९ चौफुट व शहरी करीता ३० चौ.मी. घरकूल बांधकामासाठी मोकळी जागा किंवा कच्चे घर असावे. तसेच महानगरपालिका यांनी दिलेला बांधकाम परवाना व शासन निर्णयाप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन विहीत नमुन्यातील अर्ज तात्काळ ग्रामीण विभागासाठी – पंचायत समितीकडे, शहरी विभागासाठी- नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदकडे व महानगरपालिकेकडे सादर करावेत.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त गरजू अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यकारी अभियंता, महानगरपालिका, कोल्हापूर व इचलकरंजी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका सर्व, गटविकास अधिकारी, सर्व पंचायत समिती किंवा सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर, दुरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ येथे संपर्क करावा, असे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांनी केले आहे.