खासदार धनंजय महाडिक; जुना वाशी नाका ते बुवा चौक रस्त्याचे लोकार्पण
कोल्हापूर WATCH TEAM: केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आगामी काळात भरघोस निधी उपलब्ध होईल. महापालिकेची सत्ता जनतेने विकासाच्या अपेक्षेने महायुतीकडे दिली असून, हा विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.जुना वाशी नाका ते बुवा चौक या रस्त्यासाठी खासदार निधीतून खर्च करण्यात आलेल्या ६० लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
उभा मारुती चौक ते साने गुरुजी वसाहत हा शहर आणि उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या २५ वर्षांपासून दुरवस्थेत होता. रस्त्यावर डांबरीकरण झाले नसल्याने रहिवासी, व्यावसायिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या कामासाठी उपमहापौर अक्षय जरग, माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी खासदार महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ड्रेनेजसाठी २० लाख आणि रस्त्याच्या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.
२५ वर्षांपूर्वी रस्ता झाला होता. आता विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग उपमहापौर असताना त्याच रस्त्याचे काम पूर्ण झाले, हा योगायोग आहे. आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, उपमहापौर अक्षय जरग, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, विक्रम जरग, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, प्रसाद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


























