शिवाजी स्टेडियम येथील अद्ययावतीकरण केलेल्या जलतरण तलावाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर – शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावात सराव करुन आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तयार झाले असून या नूतनीकृत तलावात सराव करुन यापुढेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे अधिकाधिक जलतरणपटू तयार होण्यासाठी क्रीडा विभागाने प्रयत्न करावेत तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून अशी खेळाडूंच्या व नागरिकांच्या हिताची नाविन्यपूर्ण विकास कामे करण्यावर भर द्यावा, अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून शिवाजी स्टेडियम येथील अद्ययावतीकरण केलेल्या जलतरण तलावाचे पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या तलावात पोहण्याचा सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या जलतरणपटूंचा सत्कार पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शिवाजी स्टेडियम येथील या जलतरण तलावामध्ये आजवर अनेक जलतरणपटू तयार झाले आहेत. सर्वसामान्य जलतरणपटूंना अत्यंत माफक दरात योग्य मार्गदर्शन व पोहण्याचा सराव करता यावा, यासाठी क्रीडा अधिकारी व प्रशिक्षकांनी प्रयत्न करावेत. तलावासाठी योग्य ती नियमावली तयार करावी. तसेच आजवर चमकदार कामगिरी केलेल्या जलतरणपटूंचेही मार्गदर्शन घ्यावे. कोल्हापूर शहरातील अनेक जलतरणपटूंचे आकर्षण असलेल्या या जलतरण तलावाचे जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमुळे रुपडे पालटले आहे. यापुढेही जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून खेळाडू व नागरिकांच्या हिताच्या नाविन्यपूर्ण कामांवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, वीरधवल खाडे, आदेश रुकडीकर, रचित नरसिंहानी, मानसिंग पाटील, संदिप पाटील यासारखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू व प्रशिक्षक या जलतरण तलावात सराव करुन तयार झाले असून त्यांना आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, रेल्वे, महसूल आदी विभागांमध्ये नोकरी मिळाली आहे. या तलावात सराव करुन ऑलिंपिक दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.