प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सामावून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर : जनसुरक्षा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ग्रामपंचायत प्रशासन व जिल्ह्यातील बँकर्सना केले.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन कांबळे, गटविकास अधिकारी, बँकांचे जिल्हा समन्वयक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
दिनांक 1 एप्रिल ते 30 जून 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान बँकांच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर विविध तारखांना शिबिरे घेण्यात येणार आहेत. ही शिबिरे यशस्वी होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कुटुंबातील विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू ओढवला तर त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या या विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (अपघाती) योजनेचा केवळ 20 रुपये वार्षिक हप्ता असून ही योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (नैसर्गिक/अपघात)योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. एकूण केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात. या योजनांबाबत व्यापक जनजागृती करुन जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना या विमा योजनेत सहभागी करुन घ्यावे. नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी भित्तीपत्रके, माहितीपत्रिकांचे वाटप करा. समाज माध्यमांसह विविध माध्यमांद्वारे योजनेची व्यापक प्रसिद्धी करा. बचत गटातील १०० टक्के महिलांना या मोहिमेअंतर्गत सामावून घेण्याबाबतही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळाला सूचना केल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, सर्व व्यापारी बॅंका, कोल्हापूर जिल्हा बँक व संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने चोख नियोजन करण्यात येत आहे.