रंगपंचमी खेळली त्यांनी, पोलिसांनी अशी केली कारवाई!
रंगपंचमीदिनी कोल्हापुरात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; ५५९ वाहनचालकांवर कारवाई
कोल्हापूर – रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५५९ वाहनचालकांवर कारवाई केली. यामध्ये ४,२६,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
कारवाईचा तपशील असा :
दारू पिऊन वाहन चालवणे: २० प्रकरणे
ट्रिपल सीट वाहतूक: १८१ प्रकरणे
वाहन चालवताना मोबाईल वापरणे: ४२ प्रकरणे
सायलेन्सर बदलणे (मोडिफाइड सायलेन्सर): ८ प्रकरणे
इतर वाहतूक नियमभंग: ३०८ प्रकरणे
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले की, सुरक्षित आणि नियमबद्ध वाहतूक राखण्यासाठी पोलिसांकडून सतत कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आपले आणि इतरांचे जीवन सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरामध्ये अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबवण्यात येतील, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.