५ लाख रुपयांची लाच घेताना शाहुवाडीत आरोपी रंगेहाथ पकडला
शाहुवाडी (जि. कोल्हापूर) – तहसीलदार कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच घेताना सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरेवाडी, ता. शाहुवाडी) याला अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या मामेभावाने आणि त्यांच्या सहहिस्सेदारांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, फेरफार प्रक्रियेत गट क्रमांकांमध्ये छेडछाड झाल्याचे आढळून आले. सदर फेरफार दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांचे नातेवाईकांनी शाहुवाडी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
तक्रारदाराने प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना सुरेश खोत याने तहसीलदारांकडून काम करून देण्याचे सांगून लाचेची मागणी केली. आरोपीने तहसीलदारांना देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूरकडे केली.
ACB पथकाने सापळा रचून आरोपीला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई शिरीष सरदेशपांडे (पोलिस उपआयुक्त व पोलीस अधीक्षक, ACB, पुणे), डॉ. शितल जान्हवे खराडे (अपर पोलीस अधीक्षक, ACB, पुणे) आणि विजय चौधरी (अपर पोलीस अधीक्षक, ACB, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, स.पो. फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदीप काशीद, पो.ना. सुधीर पाटील, पो.कॉ. उदय पाटील आणि चा.पो.कॉ. प्रशांत दावणे यांनी सदर कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
जनतेसाठी आवाहन
लाचखोरीविरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरोच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२०२१ किंवा हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार देण्यासाठी ७८७५३३३३३३ या क्रमांकाचा उपयोग करू शकता.