विनायक जितकर
मधाचे गाव पाटगाव भेटीत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे हात असलेला ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रमामुळे भविष्यात मधु पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवून गाव स्वावलंबी होईल. तसेच पाटगाव हे मधमाशी पालनासाठी देशातील सर्वोकृष्ट गाव होवून हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी व्यक्त केला.
भुदरगड तालुक्यातील मौजे पाटगाव येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ‘मधाचे गाव पाटगाव’ या अभिनव उपक्रमांतर्गत होणा-या कामाची पाहणी केली. यामध्ये पाटगाव येथील ग्राम पंचायत इमारत व विविध घरांचेही मधमाशांच्या थीमवर शुशोभीकरण करण्यात आले असुन ग्रामपंचायतीच्या पहिल्या मजल्यावरील बाजुस माहिती व प्रशिक्षण दालनाची पाहणी त्यांनी केली. |
अंशु सिन्हा म्हणाल्या, जिल्ह्याच्या पश्चिम भागात वन समृध्द असल्याने मधमाशा उद्योग करण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे या परिसरातील मध उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मध व मधमाशा वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यासाठी राज्यात सातेरी मधमाशी वसाहतीस मोठ्या प्रमाणात मागणी असुन या मागणीचा पुरवठा येथून होऊ शकतो. त्यामुळे येथील तरुणांना, मधपाळांना मधाबरोबरच मधाचे पराग, विष, रॉयलजेली, मेण अशी मौल्यवान उत्पादने तयार करुन त्यापासून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. तसेच महिलांनी मध उद्योगाबरोबर इतर उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा. तसेच मंडळाकडून उद्योगासाठी अर्थसहाय्याचा लाभ घेण्याचे अवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने ‘मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम हाती घेतला असून त्यात सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणा एकत्र करुन हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कृषी व वन विभाग यांना मधमाशांसाठी लागणारी झाडे तसेच पिके मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे तसेच त्याबाबतचा आराखडा करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच पाटगाव परिसरात रांगणा किल्ला, मौनी महाराज मठ, पाटगाव धरण अशी ऐतिहासिक व नैसर्गिक परिस्थीती गावास लाभली आहे. त्यामुळे मधाबरोबर मधु पर्यटनाचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.
मौनी महाराज मठात एक आकर्षक असा सेल्फी पाईॅन्ट लावण्यात आला आहे. मधमाशी वाचवा हा संदेश पाटगावच्या घराघरांत कोरला गेला आहे. या सोबत 100 मधपाळांना बी ब्रीडींग प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या सोबत अंशु सिन्हा यांनी चर्चा केली. पुढील टप्प्यात मधाचे गाव पाटगाव येथे मध संकलन, मध प्रक्रीया करणे, मेणपत्रा प्रक्रीया प्रशिक्षण व मधुबन यासाठी स्वतंत्र सामुहिक सुविधा केंद्राची तरतुद करण्यात आली असून या जागेची पाहणी करण्यात आली.
पाटगाव परिसरातील मधपाळ, ग्रामस्थ, महिला यांच्याशी पाटगाव येथील दत्त मंदिरात एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला. यामेळव्याचे प्रस्ताविक मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील यांनी केले. मेळाव्यासाठी पाटगावचे सरपंच श्री. देसाई व ग्रामस्थ, तहसीदार श्रीमती वरुटे, सामाजिक वनिकरणाच्या उप वनसंरक्षक उज्वला पवार, गट विकास अधिकारी एस. एम. गावडे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांनी तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दतात्रय कुरुंदवाडे यांनी आभार मानले.