विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला कामगार विधेयकाला विरोध…
मुंबई – महाराष्ट्र कामगार विधेयक हा कामगाराला गुलाम करणारा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्यांनी या कायद्याला विरोध दर्शविला आहे. हा कायदा आल्यास कामगार संघटनेत हस्तक्षेप करता येईल. कामगारांना केव्हाही कामावरून काढून टाकले जाईल. तसेच सरकारला अधिकार मिळतील पण फायदा उद्योजकांच होईल आणि उद्योजकांची मुजोरी वाढेल. कॉर्पोरेट कंपन्यांना खुश करण्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे हे विधेयक पुढे जाऊ देऊ नये अशी भूमिका दानवे यांनी घेतली. कामगार न्यायालय ही कामगारांना न्याय मिळण्यासाठी असतात, मात्र प्रत्यक्षात त्यांना तिथेही न्याय मिळत नाही ही स्थिती आहे. उद्योजक हे कामगाराला १००टक्के पगार देत नाही मात्र वकिलाला लाखो रुपये फी देतात, अशी मानसिकता उद्योजकांची सातत्याने रहात आली आहे. कामगार हा सर्वसामान्य माणूस आहे. उद्योजकांना कायद्याचा धाक असतो.
उद्योजकांच्या उत्साहीपोटी अनेक कामगार देशोधडीला लागलेत, अनेकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न उद्योजक करत आलेत. आपली औद्योगिक स्थिती इतर राज्याच्या तुलनेत भिन्न आहे. आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य असून फुले, शाहू व आंबेडकरांच राज्य आहे. कामगार नेत्यांचा राज्य आहे. एक प्रभावी चळवळ देशात निर्माण होण्याच काम महाराष्ट्रच करत आला आहे. हा कायदा ५२ लाख कामगारांपैकी ५२ हजारांनाही संरक्षण देऊ शकणार नाही. त्यामुळे याचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे दानवे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ नेमले पण आता त्याची स्थिती काय? महाराष्ट्र सुरक्षा मंडळ चाललं पाहिजे. त्याची पाहणी करण्यासाठी सुपरवायझर पद निर्माण होण्याची आवश्यकता आहे,अशी सूचना दानवे यांनी केली आहे. आज महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाहणी करणारी कोणतीही यंत्रणा नाही. आज खासगी सुरक्षा रक्षक अनधिकृत परवानगी न घेता चालवितात, त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.