महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर मुरगुडला कृषिपंप ग्राहकांना कपॅसिटर बसविण्याचे प्रात्यक्षिकाव्दारे प्रशिक्षण
कोल्हापूर परिमंडळ : योग्य दाबाचा वीजपुरवठा व्हावा, विद्युत पंप व विद्युत रोहित्रे जळणे वा नादुरूस्त होऊ नये, वीजबिलात बचत याकरीता बहुपयोगी ठरणाऱ्या कपॅसिटरचा वापर कृषिपंप ग्राहकांनी करावा, या हेतूने महावितरण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचली आहे. मुरगुड उपविभागतील जैन्याळ गावाच्या शेतशिवारातील 25 कृषिपंप ग्राहकांना कपॅसिटरचे फायदे सांगुन ते बसविण्याचे प्रात्यक्षिक महावितरणकडून दाखविण्यात आले. शाखा अभियंता शिवाजी गावडे यांनी सदरील प्रशिक्षण दिले.
जैन्याळ येथील 5 अश्वशक्ती कृषिपंप वापरणाऱ्या 25 शेतकऱ्यांना एकत्र करून शेतात विहिरीवरती कृषिपंपाच्या मोटारीला कॅपॅसिटर नसताना येणारा करंट व्होल्टेज व कॅपॅसिटर जोडल्यानंतर येणारे करंट व्होल्टेज हे प्रात्यक्षिक करून दाखवले. कॅपॅसिटर बसविल्याने होणारे फायदे समजावून सांगण्यात आले. एका ग्राहकास 2 केव्हीएआर क्षमतेचा कॅपॅसिटर महावितरणकडून देण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच संजय बरकाळे यांनी ग्राहकांमध्ये कपॅसिटरबाबत जनजागृती करणार, असे आश्वस्त केले. यावेळी मुगळी गावचे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ चेचर उपस्थित होते. मुरगुड उपविभागातील प्रत्येक गावामध्ये आगामी काळात सदर प्रात्यक्षिक करण्याचा महावितरणचा निर्धार आहे. उपविभागीय अभियंता श्री.हेमंत येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.