विनायक जितकर
राज्याचे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना दूध उत्पादकांची बाजू समजावून सांगितली होती.
कोल्हापूर : राज्यातील दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ संकरीत गायी/म्हशींचे गट वाटप करणे या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे २७ एप्रिल २०२३ रोजी याचा शासन आदेश करण्यात आला. डॉ. चेतन नरके यांनी मागील वर्षभरात सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करून याचा पाठपुरावा केला होता. राज्याचे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारंवार भेट घेऊन त्यांना दूध उत्पादकांची बाजू समजावून सांगितली होती. यामुळे वाढीव अनुदानासह पश्चिम महाराष्ट्रातील यापूर्वी या योजनेपासून वंचित असणार्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि पुणे जिल्हातील दूध उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. सदरची योजना राज्यात सन 2023 – 24 या आर्थिक वर्षापासून लागू होत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी, ०२ संकरित गाई, ०२ म्हशींचा एक गट 50 टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत वाटप करावयाच्या प्रती गायीची रुपये ७०,०००/- तर प्रती म्हशीची रुपये ८०,०००/- इतकी आधारभूत किंमत निश्चित केली आहे.
सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित 50 टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के रक्कम स्वतः अथवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभे करावी लागेल. योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमती पेक्षा जनावराची अधिक किंमत असेल तर वरील रक्कम हि लाभार्थीने स्वतः अदा करण्याची आहे. ३० टक्के महिला आणि ३ टक्के विकलांग यांना प्राधान्य असणाऱ्या या योजनेत महिला बचत गटातील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी आणि रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीकृत असलेले सुशिक्षित बेरोजगार सहभागी होऊ शकतात.
लाभार्थीकडे दुधाळ जनावरांच्या पालन करण्यासाठी पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त दूध देणाऱ्या संकरीत आणि सुधारित जातीच्या तसेच दुसर्या किंवा तिसर्या वेताच्या गायी आणि म्हशींची खरेदी या योजनेस पात्र आहे. जनावरांचा तीन वर्षांचा विमा बंधनकारक आहे. तसेच तीन वर्षे व्यवसाय करणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दुग्धव्यवसाय आणि पशु संवर्धन विषयक प्रशिक्षण घेणे देखील आवश्यक आहे. लाभार्थीस ७/१२ उतारा, रहिवाशी दाखला, आधार कार्ड, अपत्य दाखला आणि बँक खाते नंबर या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा तपशील http://ah.mahabms.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली असून योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याने गुगल प्ले स्टोअर वरील AH – MAHABMS या मोबाईल ॲप वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
आलेल्या अर्जांची छाननी करून निवड समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थींची यादी पशुसंवर्धन विभागाच्या सूचना फलक आणि संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. डॉ चेतन नरके यांच्या प्रयत्नातून मिळणाऱ्या वाढीव अनुदानाचा लाभ राज्यातील सर्व दूध उत्पादकांना मिळणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. नरके यांनी केले आहे. दूध उत्पादकांनी डॉ. नरके यांचे आभार मानले आहेत. |