कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोल्हापूर विभाग नियंत्रकांकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित लाभांबाबत आज सहीचे निवेदन सादर करण्यात आले असून, तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०२५ व २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही निवृत्तीवेतन, उपदान (ग्रॅच्युइटी) तसेच रजा रोखीकरणाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात किमान ७० पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचारी या समस्येने प्रभावित असून, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन सर्व प्रलंबित देयके मंजूर करावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अध्यक्ष, सेवानिवृत्त कर्मचारी जनसंघ संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली विविध कर्मचाऱ्यांनी आज सहीचे निवेदन दिले. या निवेदनावर धोंडीराम माने, विजय भोसले, प्रेमानंद पेडणेकर, संदीप मोहिते, अशोक दळवी, विलास माने, सुभाष शिलेदार, अविनाश चोपडे आदींच्या सह्या आहेत.
























































