अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते मंगळवारी उदघाटन
कोल्हापूर – निसर्गाचे जतन करणारी व निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव देणाऱ्या आजरीज इको व्हॅलीचे येत्या मंगळवारी, ता. २८ मार्च रोजी कणेरी मठाचे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता उदघाटन होणार असल्याची माहिती शेखर आजरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पतीही विपुल प्रमाणात आहेत. त्याच दृष्टीने वेसरफ येथे ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून आजरीज इको व्हॅली, या नावे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले अग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. दहा एकरामध्ये विस्तारलेल्या व इको फ्रेंडली असणाऱ्या या सेंटरमध्ये १५ अडव्हेंचर प्रकार आहेत. पुढे पुढे त्याचा विस्तार करू. येथील आहार हा पूर्ण शाकाहारी असेल.
ते म्हणाले, आजची युवा पिढी कोठेतरी दिशाहीन होत आहे. भरकटत आहे. ती निसर्गाशी एकरूप कशी होईल, निसर्गाकडे ओढा कसा वाढेल, यासाठी ही व्हॅली कारणीभूत ठरेल. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून महिन्यातून एकवेळ अनाथाश्रमातील, दिव्यांग मुलांची येथे सफर घडविणार आहोत. अगदी ज्येष्ठांनाही आपल्या शारीरिक व्याधींची काही आठवण होणार नाही, अशी सफर त्यांना मोफत घडवू.
श्री. आजरी म्हणाले, व्यावसायिकपणा जपताना येथील जवळपास ५० च्या वर स्थानिकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर कणेरी मठाच्या सहयोगाने येथील दुर्गम भागामध्ये शेतीचे उत्पन्न कसे वाढेल, शेतकऱ्यांचा विकासाचे व्हिजन असेल. अग्रो टुरिझम सेंटरच्या माध्यमातून येथील नैसर्गिक औषधी घटकांचा वापर केला जाईल. ते म्हणाले, निसर्गाचे अनमोल महत्त्व जाणून सुरू केलेले आजरीच इको व्हॅली निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव देणारे हे ठिकाण निश्चितच आपले नाते निसर्गाशी जोडून देईल, हे मात्र निश्चित.
यावेळी रेसिडेन्सी क्लबचे सचिव अमर गांधी, ऋग्वेद आजरी, डॉ. संदीप पाटील, अशोक रोकडे, पी. एस. जाधव व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ आदी उपस्थित होते.