कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त सोमवार दि. 30 जानेवारी रोजी (RUN FOR LEPROSY) मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग)च्या सहायक संचालक डॉ. उषा कुंभार व वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता पालेकर यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त ‘रन फॉर लेप्रसी’ ही मॅरेथॉन 30 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर शहरातील 14 ते 17 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8 वाजता कुष्ठरोग कार्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर येथून सुरु होणार आहे. या मॅरेथॉनला महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.