राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून
302 कोटी वाढीव निधीची मागणी
*जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडाची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
*कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2023-24 चा शासनाकडून दिलेल्या वित्तीय मर्यादेनुसार 389 कोटी 36 लाखाचा आराखडा सादर
कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन 2023-24 राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधाण सन 2023-24 साठी शासनाने ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेनुसार 389 कोटी 36 लाखाचा आराखडा सादर केला आहे. परंतु यामध्ये विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रासाठी 302 कोटी वाढीव निधीची मागणी त्यांनी वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे केली.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुके असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेसह नव्याने निर्माण करण्यात आलेली इचलकरंजी महानगरपालिके बरोबरच 13 नगरपंचायत/ नगरपरिषदा आहेत. अति पर्जन्यमान, महापुराची वारंवारता व सन 2016-17 पासून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये 302 कोटीची वाढ मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
वाढीव मागणी मध्ये सामान्य शिक्षणासाठी 40 कोटी, व्यवसाय तंत्र उच्च शिक्षणासाठी 12 कोटी 50 लाख, पर्यटनासाठी 29 कोटी, आरोग्य सेवेसाठी 64 कोटी 33 लाख, नगर विकास साठी 56 कोटी, रस्ते विकासासाठी 20 कोटी, ग्राम विकाससाठी 17 कोटी तर जिल्ह्यातील कुस्तीची परंपरा जपण्यासाठी जुन्या व ऐतिहासिक तालमीचे संवर्धन व सक्षमीकरण करता 8 कोटी 50 लाखाच्या विशेष निधीची मागणी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत वित्त व नियोजन मंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
कोल्हापूर जिल्ह्यात 200 हून अधिक शाळांना 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेकडील नवीन 533 वर्ग खोल्या बांधकाम व 2 हजार 69 प्राथमिक शाळा खोल्या नादुरुस्त आहेत, त्यांचे दुरुस्ती करिता तसेच 224 नवीन शाळा स्वच्छतागृह बांधकाम व 263 शाळा स्वच्छतागृहांची दुरुस्ती, 349 शाळांना संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याने जादा निधी मंजूर होणे आवश्यक आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामुग्रीकरिता तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रशिक्षण व सुविधा केंद्र उभारण्यासाठी 4 कोटी व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण, प्रसार व सुविधा केंद्राकरिता 100 कोटी निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारण अंतर्गत 425 कोटीची तरतूद मंजूर असल्याचे सांगून सन 2023-24 सर्वसाधारण प्रारुप आराखडा शासनाच्या वित्तीय मर्यादेच्या सूचनेनुसार 389 कोटी 36 लाखाचा केल्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती सन 2023-24 च्या प्रारुप आराखड्यात 302 कोटी 76 लाखाची वाढीव मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गाभा क्षेत्रातील कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, पाटबंधारे व पूर नियंत्रण, सामाजिक व सामुहिक सेवा यासाठी एकुण 213 कोटी 8 लाख रुपयाचा तर बिगर गाभा क्षेत्रातील ऊर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, आणि सामान्य सेवा यासाठी 89 कोटी 68 लाखाची अतिरिक्त निधीची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनीही नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी महानगरपालिका विकासासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव तरतूद करावी. यासाठी राज्य स्तरावरून अधिकचा निधी देण्याची मागणी केली.
या बैठकीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.