कोल्हापूर :शिक्षण खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना सन्मानाची वागणूक द्या. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घ्या आणि त्या सोडवा असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले. शिक्षण उपसंचालक यांनी एसएससी बोर्ड कोल्हापूर येथे आयोजित शिक्षणसंस्था महामंडळ कोल्हापूर विभागीय पदाधिकारी व संस्थाचालक सहविचार सभेत ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी शिक्षण संस्थांना व संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या २९ समस्या मांडल्या.महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शिक्षण संस्थांचे प्रश्न तातडीने सुटण्यासाठी शिक्षण खात्याने पावले उचलावीत असे सांगितले.
शिक्षण उपसंचालक महेश चोथेसो यांनी शिक्षण उपसंचालक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शासन स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक शिफारस करण्यात येईल असे सांगितले.पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करणे, विनाअनुदानित शाळांना १००% अनुदान, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासाठी शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना ज्या अडचणी उद्भवणार आहेत त्या शासनाने नेमलेल्या समितीसमोर मांडण्यासाठी शिक्षण संस्था महामंडळाचा पुढाकार याविषयी आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केले व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.
सन २०२१-२२ ची संचमान्यता तातडीने करा असे त्यांनी सूचित केले. आरटीई कायद्यांतर्गत २५%शुल्क परतावा तातडीने द्या. याबाबत सर्व माहिती घेऊन हा प्रश्न निकाली काढा व जे अधिकारी व कर्मचारी या कामी हयगय करतात त्यांच्यावर कारवाई करा असेही त्यांनी सांगितले. आमदारांनी केलेल्या सूचनेप्रमाणेआचारसंहिता संपल्यानंतर अल्पसंख्याक संस्थांनी सरळसेवा व पदोन्नतीने केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला व कोर्टाच्या आदेशानुसारच्या मान्यता व नवीन भरतीसाठी अल्पसंख्याक संस्थांना भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मा. चोथे साहेब यांनी सांगितले. सहविचारसभेत आमदार आसगावकर यांनी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळेत निकाली काढण्यासाठी यंत्रणा गतीमान करण्याची सूचना केली.
स्पर्धा परीक्षेबरोबरच चित्रकलेची तिला विशेष आवड व कौशल्य
यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष शिवाजी माळकर, विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, कोल्हापूर जिल्हा संघाचे सेक्रेटरी जयवंतराव देशमुख, एन. आर. भोसले,बाबा पाटील, सिंधुदुर्गचे श्री. सामंत, इचलकरंजीचे पुंडलिक जाधव, बोर्डाचे सचिव पवार साहेब व कोल्हापूर विभागातील शिक्षण संस्था चालक उपस्थित होते.