होळी म्हटलं की, बोंबलायचा सण एवढचं लहानपणी आम्हांस ठाऊक होतं. हळूहळू त्याचा अर्थबोध होत गेला. या एकाच दिवशी समाजमान्य सुशिक्षितपणा बाजूला ठेवून मनमुराद शिमगा करायची मुभा असायची. इतरवेळी बोंबललं तर अपशकुन होईल असं आमची आज्जी म्हणायची….करदुड्यात आवळलेली खाकी चड्डी सावरत पाण्याच्या टाकीजवळ, पेटवलेल्या होळीसमोर उलटा हात करुन जोरात बोंबलायचो. दोन गटात बोंबलायची स्पर्धा लागायची. आमचं लंब्या अन मी गल्लीतल्या चारपाच पोरांना घेवून प्रत्येक घरातून पाच-पाच शेण्या गोळा करायचो. यरंमुगलीचं झाड मध्ये ठेवून बाजूने शेण्या लावून होळी पेटवून दिली जायची. गावातुन बायका, शेंबडी पोरंपण नैवेद्य घेऊन यायची. होळीला पाच राउंड मारुन पूजा करायचीत…
गाव सोडून आता बरीच वर्षे उलटली आहेत. पोलीस दलातील नोकरीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बरीच भटकंती झाली. आता पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्थिरस्थावर होत आहे, त्यावेळी लहानपणीच्या आठवणींचा पिंगा कायम आहे. आजच्या कॉस्मोपॉलिटन जग रहाटीत साऱ्या सणांची सरमिसळ झाली आहे. उत्तर भारतातील रंगपंचमी महाराष्ट्रात होळीच्या दिवशीच साजरी व्हायला लागली आहे. त्यात कोणाला काही वावगे वाटत नसले, तरी मला मात्र आजही गावाकडची लहानपणीची होळी लख्ख आठवत राहते. |
पर्यावरणाच्या रक्षणासाठी कालपरत्वे पारंपारिक होळीच्या धामधुमीत बदल करणं क्रमप्राप्त असले, तरी वाटतं त्या होळीतल्या आकाशाला भिडणाऱ्या ज्वालांत वयाने मोठं होत असताना निर्माण झालेला माझ्यातलाही सारा द्वेष जळून जावा. मत्सराच्या कितीतरी गोष्टी मनात ठेवून माणूस आयुष्यभर जगत असतो. द्वेषाच्या लढाईत मी जिंकेनही कदाचित, पण पुढच्याचे आशीर्वाद मात्र मला कधीच मिळणार नाहीत…..कधीकधी माझेचं विचार मी लादत राहतो इतरांवर… पण मी मान्य करावं, त्यांचही वेगळं अस्तित्व…जगात अनेक विचारप्रवाह राहतील . . . त्यात मतभेदही होतील पण मी
मात्र माणूसपणाच्या वाटेवर चालावं…वैश्विक व्हावं.. मत्सराची जळमटं घेऊन आयुष्याच्या उत्तरार्धाकडे जाणारी वाट मला चालायची नाही…मला मळायचीय प्रेमाची नवी वाट…आणि या मळलेल्या आडवाटेवरुन येणारा वाटसरु मला भेटेल, तेव्हाच मी होईन कृतार्थ….आजही संध्याकाळी होळी पेटेल …मी पुन्हा बेंबीच्या देठापासून बोंबलेन… त्या आवाजाबरोबर माझ्यातले सारे दुर्गूण पूर्ण जळत जातील…त्याची झालेली राख कपाळी लावून मी मारेन फेरी त्या धगधगत्या होळीला…माझं बोंबलणं सार्थ ठरावं एवढचं मनोमन वाटतं…..
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…
मितेश घट्टे,
२०.०३.२०१९
( पुनर्लिखित )