|
गांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच; खासगी पार्किंग तत्काळ बंद करा
आमदार राजेश क्षीरसागर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश; महिनाभरात मैदान सुसज्ज करण्याची कालमर्यादा कोल्हापूर WATCHTEAM : ऐतिहासिक गांधी मैदानाचा वापर केवळ खेळ आणि क्रीडा उपक्रमांसाठीच करण्यात यावा. मैदानावरील व्यावसायिक व खासगी पार्किंग तत्काळ बंद करून, महिनाभरात सपाटीकरण व मूलभूत सुविधा पूर्ण करून मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करावे, असे स्पष्ट निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. या विकासकामांचा सविस्तर आराखडा येत्या चार दिवसांत सादर करण्याची मुदतही त्यांनी दिली.
आमदार क्षीरसागर यांनी गांधी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून खेळाडूंच्या अडचणींचा आढावा घेतला. शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ परिसरातील सुमारे दहा हजार खेळाडू व नागरिक येथे सरावासाठी येतात. मात्र, अनधिकृत पार्किंग आणि वारंवार उद्भवणाऱ्या ड्रेनेज समस्येमुळे खेळाडूंना पुरेशी जागा मिळत नसल्याचे निदर्शनास आले. यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी मैदानाचा मूळ उद्देश जपण्याच्या सूचना दिल्या.
प्रमुख निर्देश आणि विकासकामे :
महापालिका सभेत ठराव करण्याच्या सूचना
गांधी मैदान केवळ क्रीडा उपक्रमांसाठीच राखीव ठेवण्याबाबत महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर करून घ्यावा, तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नाममात्र भाडे आकारण्यात यावे, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित नगरसेवकांना दिल्या. या पाहणीवेळी उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक अजय इंगवले, प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, कपिल सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, उपशहर अभियंता मिलिंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.
|


























