|
कोल्हापूर | WATCH TEAM
कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १४ च्या काँग्रेस नगरसेविका दिलशाद मुल्ला यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी कोणाचीही तक्रार नसताना आणि दक्षता पथकाचा अहवाल सकारात्मक असतानाही हा निकाल आल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयाविरोधात मुल्ला यांनी पुणे येथील संबंधित आयुक्तांकडे अपील दाखल केले असून, न्यायासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय?
दिलशाद मुल्ला यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून ओबीसी (OBC) प्रवर्गातील ‘मुल्लाणी’ जातीच्या दाखल्यावर महापालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील जात पडताळणी समितीसमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दक्षता पथकाने (Vigilance Cell) मुल्ला यांच्या ‘मुल्लाणी’ जातीसंदर्भात सकारात्मक अहवाल समितीच्या अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. अचानक आलेल्या निकालाने आश्चर्य!
दक्षता पथकाचा अहवाल अनुकूल असल्याने प्रमाणपत्र वैध ठरेल अशी अपेक्षा असताना, २६ ऑक्टोबर रोजी पोस्टाद्वारे त्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आदेश प्राप्त झाला. कोणाचीही हरकत किंवा तक्रार नसताना समितीने हा निर्णय घेतल्याने मुल्ला कुटुंबीयांसह राजकीय विश्लेषकांनीही या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. कायदेशीर लढाईचा पवित्रा:
समितीच्या या अनपेक्षित निर्णयाला दिलशाद मुल्ला यांनी तातडीने पुणे येथील संबंधित आयुक्तांकडे अपील दाखल करून आव्हान दिले आहे. “आमच्यावर अन्याय झाला असून, या निर्णयाविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत आणि आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” अशी ठाम भूमिका दिलशाद मुल्ला यांनी ‘पॉझिटिव्ह वॉच’शी बोलताना स्पष्ट केली. दरम्यान, या प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक १४ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, पुणे येथील अपिलाच्या सुनावणीत नेमका काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
|

























