कोल्हापुरच्या ‘न्युटन’ चा नवा सिध्दांत, ५ रूपयेची वस्तू पाचशेला !*– जयराज कोळी
कोल्हापूरः येथील सुप्रसिद्ध, नागरिकांचे जिव्हाळ्याचे असलेले कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिला राजे रूग्णालय दिवसेंदिवस विविध कारणांनी चर्चेत येऊ लागले आहे. आता या ठिकाणी सर्जीकल साहित्य खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे. एका सर्जिकल साहित्य पुरवणा-या बोगस कंपनीने बनावट कागदपत्र सादर करून टेंडर भरत, अधिका-यांना हाताशी धरून सुमारे दहा कोटीचे साहित्य खरेदी केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व सदस्य पदाधिकारी यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष जयराज कोळी म्हणाले की, ‘न्युटन’ एंटरप्रायजेस या कोणताही परवाना नसलेल्या कंपनीने सुमारे साडे नऊ कोटीचे सर्जिकल साहित्य खरेदी केले आहे. जगाला ‘न्युटन’ नावाचा शास्त्रज्ञ व जगप्रसिध्द सिध्दांतही माहिती आहे. पण या कोल्हापुरच्या नव्या घोटाळेबाज ‘न्युटन’ ने भ्रष्टाचाराच्या बाबतीत बनावट कागदपत्र सादरून करून टेंडर भरत नवा सिध्दांत मांडत सर्जिकल साहित्याच्या किंमती बाजारापेक्षा वाजवी दराने खरेदी करून पाच रूपयेची वस्तू तब्बल पाचशेला खरेदी करत मोठा घोटाळा केला आहे. यात न्यूटन कंपनीला राजकीय वरदहस्त तसेच सीपीआर मधील काही मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा यात संशय बळावत असून यात काही अधिकारी काही अंशी सामील असल्याचा गौप्यस्पोट कोळी यांनी केला आहे.
कोळी म्हणाले की, विशेष म्हणजे इतका मोठा घोटाळा उघड होवून घोटाळा करणाऱ्या कंपनीवर तसेच मालकावर कोणताही कारवाई न करता, चौकशी समितीनेही अजब खुलासे करत, कंपनीला वाचविण्याचे काम केल्याने यात संशय वाढला आहे. घोटाळेबाज ‘न्युटन’ कंपनी आणि मालकाला जिल्ह्यातील राजकीय नेत्याचे पाठबळ तर नसावे ना अशी शंका उपस्थित करत काेळी यांनी साऱ्या प्रकारांची चाैकशी पालकमंत्री यांनी करावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकात केली आहे. राजकीय नेत्यामुळे लोकांच्या सेवेसाठी उघडण्यात आलेले सरकारी दवाखाने दलालीचे अड्डे झालेत की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. असे सदस्य व पदाधिकारी म्हणाले.
सरकारी दवाखान्यात सामान्य माणूस उपचारासाठी, सुविधेसाठी तडफडत आहे. केवळ वशिलाबाज असणाऱ्या नागिरकांनाच काय तो दिलासा मिळतो. अन्यथा, येथील अपवाद सोडता अनेक वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार पावलोपावली पहायला मिळत आहे. केवळ कोल्हापुरचेच नव्हे तर राज्यभर सरकारी रूग्णालयांची अशीच अवस्था असल्याने आता सामान्य माणूस सरकारी रूग्णालयात जाताना घाबरत असल्याचे कोळी म्हणाले.
दुसऱ्या बाजूला असेही निदर्शनाला आले आहे की, रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी पगार घेतात सरकारी आणि सेवा करताहेत खासगी दवाखान्यात. अशा डॉक्टरांच्यावरही प्रशासन काहीच कारवाई करत नाही. भ्रष्ट अधिका-यांची व या सर्व दलालांची येथे मोठी साखळी निर्माण झाली आहे, सारे मिळून, पध्दतशीरपणे सरकारला न्यूटन सारख्या एजन्सीच्या माध्यमातून लुटत असल्याचा गंभीर आरोप जयराज कोळी यांनी केला.
कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिला राजे रूग्णालयात हेच घडले आहे. कोणताही परवाना नसलेल्या एका बोगस कंपनीने सर्जिकल साहित्याचे टेंडर भरले आणि काही राजकीय नेत्यांच्या छत्रखाली व येथील अधिकाऱ्यांच्या साक्षीने कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे. अधिका-यांनी कसलीही खातरजमा न करता कंपनीला टेंडर मंजूर केले. दोन वेगवेगळ्या कंपनीच्या नावे खरेदी असताना आठ कोटीचे बिल एकाच कंपनीच्या नावे अधिकारी काढूनही मोकळे झालेत. त्यामुळे न्यूट्न कंपनी व त्यांच्या मालकावर तसेच येथील भ्रष्ट अधिकारी यांच्यावर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार? असा सवाल पुरावे दाखवित कोल्हापुरचे माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी करत हा घोटाळा उघडकीस आणला आहे.यासंबंधी अन्य कंपन्यांनीही तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांनाही निवेदनातून तक्रार केली आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंबंधी सखाेल चौकशी करून संबंधित दाेषींवर कारवाई करावी अशीही मागणी काेळी यांनी केली आहे.
याचबरोबर घोटाळा उघडकीस आल्यावर आणि माध्यमात बातम्या आल्यावर चौकशीचे ढोंग रचत, समित्या नेमून दिखावा करत, बोगस कंपनीवर साधा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. न्युटन नावाची कंपनी बोगस असल्याचे सप्रमाण सिध्द होवूनही समिती, पदाधिकारी तसेच काेणी राजकीय नेते कंपनीला सावरण्याचे काम करत तर नाहीत ना असाही सवाल काेळी यांनी केलाय. विरोधी पक्षातील नेतेमंडळीही मुग गिळून गप्प असल्याने याचाचा अर्थ साऱ्यांची मिलीभगत आहे की काय असा संशय जयराज कोळी यांनी व्यक्त करत, येत्या काळात याची सक्षमतेने तसेच पारदर्शकपणे चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई न केल्यास सीपीआर वरील भ्रष्टाचाराचे संकट दूर करण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईला महासंघातर्फे अभिषेक घालून, राष्ट्रपती तसेच डब्लूएचओ कडे तक्रार करून जनहित याचिका दाखल करण्याचा मानस जयराज कोळी यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला अमरनाथ शेणेकर, शरद पोवार, प्रदीप पवार, इश्वर घाळी, निकिता पाटील, संदीप पाटील, कृष्णा वरुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.