हातकणंगले – किरकोळ कारणातून बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याने संतप्त झालेल्या बाळू विनोद जाधव याने भावाच्या मदतीने रामचंद्र तुकाराम खिल्लारी वय 27 ( राहणार लक्ष्मी इंडस्ट्री रोड हातकणंगले ) याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज दुपारी हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहती मधील वेद इंडस्ट्रीच्या दारामध्ये घडली या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.
याबाबत हातकणंगले पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहती मधील वेद इंडस्ट्रीज इथं हातकणंगलेतील रामचंद्र तुकाराम खिल्लारी काम करत होता. याच कंपनीमध्ये बाळू विनोद जाधव (वय 17 राहणार रूई ) हा ही काम करत होता. आज सकाळी मयत रामचंद्र तुकाराम खिल्लारी आणि बाळू विनोद जाधव यांच्यामध्ये वाद झाला.
यामध्ये रामचंद्र खिल्लारी यांनी बाळू जाधव याला मारहाण केली होती. म्हणून बाळू जाधव याने आपला भाऊ कपिल बजरंग जाधव ( वय २०, राहणार रुई ) याला बोलावून घेऊन मयत रामचंद्र खिल्लारी याला जाब विचारला. याही वेळी रामचंद्र तुकाराम खिल्लारी यांनी बाळू जाधव याला मारहाण केली आणि चाकू घेऊन अंगावर धावून गेला. यावेळी बाळू विनोद जाधव याने वेद इंडस्ट्रीज समोर आपल्या घरातील कोयता आणून रामचंद्र खिलारी यांच्या गळ्यावर डोक्यावर पाटीत असे सात ते आठ वार करून गंभीर जखमी केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले अधिक तपास करत असून संशयीत आरोपीस ताब्यात घेतले आहे .