विनायक जितकर
श्री नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच ४ एप्रिल पासून शाहू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव व संस्थेचे अध्यक्ष राजू साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेताजी तरुण मंडळाच्या वतीन ४ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, डॉ. प्रतिक राऊत यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. उद्घाटनाचा सामना फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि बीजीएम स्पोर्टस यांच्यात होणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना सम्राट नगर फुटबॉल क्लब व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात दुपारी दोन वाजता होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मैदानावर त्यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 16 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना प्रत्येकी ११ हजार रुपये आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, आशिष पवार, रोहन शिंदे आदी उपस्थित होते.स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज यांचा अमृत महोत्सव निमित्त सत्कार करण्यात येणार असल्याचे उद्योजक सत्यजित जाधव यांनी सांगितले.