महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार वृक्षतोड करण्याची परवानगी देण्यात येईल.
कोल्हापूर : जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला त्यांच्या शेतातील लाकूड मालास नियमानुसार चांगला दर मिळण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम, 1964 व महाराष्ट्र वन नियमावली, 2014 अंतर्गत खासगी क्षेत्रातील वृक्षतोडी संबंधित सेवा वनविभागाच्या बिगर नागरी क्षेत्रामध्ये झाडे तोडण्याकरिता बिगर आदिवासी अर्जदारांना परवानगी www.mahaforest.gov.in/forestportal या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन त्याची एक प्रत ज्या त्या तालुक्यातील वनक्षेत्रपाल यांना दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार वृक्षतोड करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती उप वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी दिली आहे.
शेतकरी वर्ग हा शेती करुन आपल्या मूलभूत गरजा भागवत असतो, तसेच आपल्या जमीनीतील झाडे विकून उदरनिर्वाह चालवत असतो. परंतू, शेतकऱ्यांनी स्वतः लावलेली व जोपासलेली झाडे ठेकेदारांना विकून त्यांना कवडीमोल दर मिळतो. शेतकरी बांधवांनी आपले लाकूड व्यापा-याकडे न विकता ते बाजार पेठेत विकल्यास चांगला दर मिळतो, यासाठी कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध आहेत. बेळगांव तसेच कोल्हापूर जिल्ह्यात वीट भट्टीसाठी जळाऊ लाकडाची मागणी असते तसेच कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी मध्ये कापड उद्योग/ सायझिंगसाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची मागणी आहे. एका ट्रकमध्ये 20 ते 25 घनमीटर लाकूड भरले जात असून त्यापासून 70 ते 80 हजार रुपये प्राप्त होतील. तसेच इमारती लाकूड विकण्यासाठी जिल्ह्यात बऱ्याच सॉ मील असल्याने त्यालाही चांगला दर मिळू शकतो.
परवानगी मिळाल्यावर एक वृक्ष तोडल्यास पावसाळ्यात एक वृक्ष लावण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन पर्यावरण संतुलनास मदत होणार आहे. तोडलेल्या मालास रक्कम रुपये 100 ऑनलाईन भरणा करुन ई-पास देण्याची कार्यवाही ज्या-त्या तालुक्यातील वनक्षेत्रपाल, वनपाल करतील. तसेच तोडलेल्या मालास योग्य बाजारपेठेचीही माहिती स्थानिक वनक्षेत्रपाल, वनपाल तसेच जिल्ह्यातील वनक्षेत्रपाल व वनपालही शेतकऱ्यांना देतील, असेही जी गुरुप्रसाद यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.