वन रँक वन पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
कोल्हापूर : वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचे 20 फेब्रुवारीपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोशिएशनने सोमवारी पाठिंबा जाहीर करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून जवळपास एक हजारांहून अधिक माजी सैनिक उपस्थित होते. आपल्या सर्व मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहचवू असे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावार यांनी माजी सैनिकांना दिले.
वन रँक वन पेन्शनचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. जेसीओ, एनसीओज, आणि जवान यांच्या पेन्शनमधील असणारी विसंगती दूर करण्यात यावी, शहीद जवानांच्या वीर माता, वीरपत्नी यांना अधिकार्यांना जेवढी पेन्शन देण्यात येते तेवढी मिळावी, एमएसपी सर्वांना समान करावी, 1971 पूर्वीची 70 टक्के पेन्शनची पध्दत परत लागू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक
वेल्फेअर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना हे निवेदन दिले. तत्पूर्वी, महावीर उद्यानातील वीर स्मारकास माजी सैनिकांनी अभिवादन केले. यावेळी माजी सैनिकांनी पेन्शन, केंद्राकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी एन.एन. पाटील, बी.जी.पाटील-वाळवेकर, अशोक माळी, बी.जी.पाटील-चुयेकर, आनंदराव पाटील, संभाजी माने, चंद्रहार पाटील, तानाजी खाडे, चंद्रकांत पाटील, शांतीनाथ बोटे, शिवाजी खोत, सुबराव पाटील, तानाजी संकपाळ, नारायण देसाई, संजय निकम, पांडूरंग मोहिते, लक्ष्मण पाटील, श्रीपती मस्कर व सर्व तालुक्यातील माजी सैनिक असोशिएशनचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
शिस्तीचे प्रदर्शन एखादे आंदोलन,मोर्चा वा निवेदन देताना सामुहिकपणे शंभरएक लोक जमले तरी रस्त्यावरून जाताना आपले एकी दाखविण्यासाठी घोषणा, फलक, दंगा हे ठरलेले असते. माजी सैनिक मात्र याला अपवाद ठरले. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास एक हजारांहून अधिक माजी सैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्यांनी कुठेही शक्तीपदर्शन, घोषणा न देता लष्कराच्या शिस्तीचे प्रदर्शन घडवित शांततेत जाऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. |
देशभरात जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन वन रॅक वन पेन्शनसाठी जंतरमंतरवर धरणे धरलेल्या माजी सैनिकांनी 3 एप्रिल रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन देत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोशिएशननेही जिल्हाधिकार्यांना निवेदन देत या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात सोमवारी एकाच दिवशी हे निवेदन देण्यात आले. |
वन रँक वन पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. यावेळी बी.जी.पाटील, आनंदराव पाटील, बबन पाटील, चंद्रहार पाटील उपस्थित होते.