खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार
जनतेला वेठीस धरण्याचा विद्युत कर्मचाऱ्यांचा प्रयत्न नाही
कोल्हापूर: महावितरणच्या खासगीकरणाविरोधात राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी आजपासून ७२ तासांचा संप पुकारलाय. तब्बल तीन दिवस हे कामबंद आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या महावितरण कार्यालयाबाहेर अधिकारी कर्मचारी आणि अभियंत्यांनी ठिय्या आंदोलन करत राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे.
महावितरणच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीनं वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडं मागितलेल्या परवानाच्या विरोधात वीज कामगार संघटनांनी मंगळवारपासून संप पुकारलाय, जिल्ह्यातील सुमारे चार हजार वीज कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेत, जिल्ह्यासह शहरातील विविध पक्ष संघटनांनी वीज कर्मचाऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला.
कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरु झालं, जोपर्यंत खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राज्य विद्युत कर्मचारी संघटनेचे विनायक पाटील यांनी सांगितलं. जनतेला वेठीस धरण्याचा विद्युत कर्मचाऱ्यांचा प्रयत्न नाही मात्र राज्य शासनाने खाजगीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.