राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली पेटवण्याचा प्रयत्न…
मुंबई – महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात अमरावती, अकोला, शेगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरसह १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा हा कुटील डाव यशस्वी होऊ शकला नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातही भाजपाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण भाजपाचे षडयंत्र जनता ओळखून आहे त्यामुळे हा डावही फसला. राज्यातील जनतेने संयम पाळला आणि सामाजिक सौहार्द हा येथील मुलधर्म असल्याने असा षडयंत्राला जनता बळ पडत नाही. काँग्रेस पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात पोलीस महासंचालक व राज्यपाल यांची भेट घेऊन चर्चा केली पण कारवाईबाबत काहीच ठोस झालेले नाही.
महागाई, बेरोजगारीसारख्या महत्वाच्या समस्या उभ्या असताना भाजपा सरकार त्यावर काहीच बोलत नाही व जनतेला दिलासा देणारे निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांवर आस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे, सरकार केवळ मदतीची घोषणा करते पण शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहचतच नाही. परवाच मुख्यमंत्र्यांनी १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली पण आधी जाहीर केलेली मदत कुठे गेली? शेतकऱ्यांना ती मिळालीच नाही. हे सर्व प्रश्न असल्याने सरकार त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.