विनायक जितकर
पन्हाळा तालुक्यातील विविध गावामध्ये सभासदांशी संवाद साधताना आमदार जयंत आसगावकर समवेत मान्यवर…
कोल्हापूर – राजाराम कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या तुमच्या गावातील शेतकऱ्याना सभासदत्वापासून का वंचित ठेवले? आमच्या कारखान्यात तुम्ही येलूरचे सभासद का वाढवले? याचा जाब मते मागण्यासाठी येणाऱ्या अमल महाडिक यांना नक्की विचारा असे आवाहन आमदार जयंत आसगावकर यांनी केले. पन्हाळा तालुक्यातील यवलुज, कसबा ठाणे, पुनाळ, काटेभोगाव, पोर्ले तर्फ बोरगाव, पाटपन्हाळा, बांद्रेवाडी, आळवे, माळवाडी, पोर्ले येथे झालेल्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
आमदार आसगावकर पुढे म्हणाले, सभासद हा कारखान्याच्या आत्मा असतो. १२२ गावांमध्ये राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. वास्तविक पाहता या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सभासदत्वावर हक्क आहे. पण महाडीकांनी या सर्व शेतकऱ्यांना मुद्दामहुन सभासदत्वापासून वंचित ठेवले आहे. दुसरीकडे मात्र येथील काही गावामध्ये राजाराममध्ये सहाशे सभासद महाडीकांनी वाढविले. तसेच राजाराम कारखाना कार्यक्षेत्रातील 4 हजार मयत सभासदांच्या वारसांचे शेअर्स त्यांच्या वारसाच्या नावावर का ट्रान्स्फर केले नाहीत, हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय असून त्याचा जाब महाडीकांना विचारा. सभासदांना न्याय मिळावा यासाठी या निवडणुकीत परिवर्तन घडवा.
कसबा ठाणेचे सरपंच व कुंभीचे संचालक अनिश पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील हे विकासाभिमुख नेतृत्त्व आहे. गगनबावडा सारख्या जादा पावसाच्या क्षेत्रात त्यानी डी. वाय. पाटील साखर कारखाना उत्तमप्रकारे चालवला आहे. राजाराममध्येही कारखाना व सभासदांच्या हिताचे काम ते निश्चितपणे करतील.
कुंभीचे संचालक संजय पाटील म्हणाले माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे समर्थक राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या कारखान्यात नक्की परिवर्तन घडणार. यावेळी कुंभीचे माजी संचालक जयसिंग पाटील, माजी पं. स. माजी सदस्य रवी चौगुले, शाहुवाडी पं. स. चे माजी उपसभापती पांडुरंग पाटील, खुपिरेचे माजी सरपंच संजय पाटील, रवी आंग्रे, पोर्ले तर्फ बोरगावचे सरपंच बाजीराव कांबळे, प्रकाश काटकर, सचिन काटकर, दत्तात्रय काटकर, लखू गायकवाड, राजेंद्र खानविलकर आदी उपस्थित होते.