शासन आपल्या दारी अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना थेट मदत…
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम दिनांक 13 जून 2023 रोजी तपोवन क्रिडांगणावर आयोजित करण्यात आला असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना थेट मदत तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा विस्तृत प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची काटेकोर अमंजबजावणी करावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावयाचे असून या अभियानाचे योग्य नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करण्याची दक्षता घेण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी काढले आहेत.
यामध्ये कार्यक्रमस्थळी मान्यवर, लाभार्थी, निमंत्रित, नागरिक यांची बैठक व पार्किंग व्यवस्था, लाभार्थ्यांना व नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, कार्यक्रमाची प्रसिध्दी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा, दिशादर्शक फलक लावणे, कार्यक्रम स्थळी स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था, आवश्यक पासेस, खर्च विषयक कार्यवाही, विविध दालने तयार करणे व समन्वय ठेवणे आदीबाबतच्या जबाबदाऱ्या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आहेत.