जनसुरक्षा मोहीमेत सर्व गावांनी सहभागी व्हावे – संजयसिंह चव्हाण

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम”

कोल्हापूर : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल ते 30 जून 2023 पर्यंत जिल्हा प्रशासन, अग्रणी जिल्हा बँक व इतर सर्व व्यापारी बँका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या योजनांमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना व्यापक स्वरुपात सामावून घेण्यासाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे वेळापत्रक संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 04.00 या वेळेत सुरु राहील. या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपले बँक पासबुक व केवायसी कागदपत्रे जसे की, पॅनकार्ड/आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे सोबत घेऊन शिबिरास भेट देवून या योजनांमध्ये आपली नोंदणी करावी.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता 20 रुपये प्रती व्यक्ती प्रती वर्षी इतका अल्प आहे. विमा धारकाचा मृत्यू झाल्यास अथवा दोन्ही डोळ्यांची संपूर्ण अथवा बरी न होणारी हानी झाल्यास किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. तसेच या योजनेमध्ये एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात व एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये इतकी भरपाई मिळते.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता 436 रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेमध्ये दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असून एकदा नोंदणी झाल्यानंतर दरवर्षी विम्याचा हप्ता ऑटोडेबिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांबरोबरच बचत गटातील महिलांनी देखील या दोन्ही योजनांमध्ये आपली 100 टक्के नोंदणी करावी. तसेच आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्याबाबत प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.