विनायक जितकर
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक…
कोल्हापूर – कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक व प्रशासकीय प्रश्न आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न प्रशासनाने दक्ष राहून तातडीने सोडवावेत अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी वेळी आमदार ऋतुराज पाटील बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत, गडमुडशिंगी, दिंडनेर्ली, उजळाईवाडी आणि सरनोबतवाडी या गावातील प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.
दिंडनेर्ली ते देवाळे हा रस्ता, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर मधून जात आहे. याबाबत शेतकऱ्यांची संमती पत्रे घेऊनच या रस्त्याचे काम करावे अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत वर्तमानपत्रांमध्ये नोटीस प्रसिद्ध करण्याबरोबरच गाव चावडीवर नोटीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जलजीवन मिशनच्या कामासाठी अनेक गावांमध्ये रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी, जलजीवन मिशन कामाच्या टेंडर मध्ये रस्ते दुरुस्तीची अट नमूद करण्यात आल्याचे सांगितले. ज्या टेंडरमध्ये रस्ते दुरुस्तीची अट नसेल त्याचे नव्याने टेंडर करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना केल्या आहेत. रस्ते दुरुस्तीशिवाय संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नये अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.
विमानतळ विस्तारीकरणामध्ये ज्यांची घरे संपादित होत आहेत त्यांना प्लॉट देण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. पात्र लोकांना प्लॉट देण्यात येणार आहेत. त्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी या बैठकीत सूचना केल्या. निर्माण चौक, कोल्हापूर येथील गट नं. 714 ए येथील एकूण 110 प्लॉट धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विषय प्रलंबित आहे. सदरची जमिनीचे एकूण क्षेत्र 4 एकर 5 गुंठे असून ही जमान महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केली आहे.या जमिनीला लागूनच असणारी 714 वी ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी शाहू सोसायटीला दिलेली आहे. काही त्रुटीमुळे सदरचे प्रकरण तहसिलदार ऑफीस प्रलंबित असून ते तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यानी यावेळी केल्या.
या बैठकीला करवीर प्रांताधिकारी विवेक काळे, भूमीअभिलेख विभागाचे करवीर उपाधीक्षक किरण माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर, नगर रचना विभागाचे सहाय्यक रचनाकार नरेश पाटील, चतुरसिह भोसले-पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.