‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
कोल्हापूर – राज्य शासनाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात. या लोकाभिमुख योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश शासकीय योजनांचा, उपक्रमांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे स्थानिक स्तरावर होऊन लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील. पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ (13 मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांत दिनांक 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा राज्य स्तरावरुन समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. तर सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना करुन या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जनकल्याण कक्षाची तर तालुका स्तरावर तालुका जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर संबधित यंत्रणेसोबत विविध आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. यानुसार सर्व संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरुन गावोगावी जावून लाभार्थ्याचे सर्वेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाशी योग्य समन्वय ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन…
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असले तरीदेखील 95 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. करवीर 10 हजार, गगनबावडा 4 हजार, शिरोळ 10 हजार, हातकणंगले 10 हजार, पन्हाळा 8 हजार, शाहूवाडी 8 हजार, कागल 8 हजार, राधानगरी 8 हजार, आजारा 8 हजार, भुदरगड 7 हजार, चंदगड 7 हजार व गडहिंग्लज 7 हजार याप्रमाणे तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. सर्वसामान्यांना लाभ मिळवून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळया ठिकाणी असतात. ती सर्व एका छताखाली आणून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, कागदपत्रातील त्रुटींबाबत संबंधित लाभार्थ्याला तात्काळ अवगत करुन त्यांच्याकडून त्रुटींची पूर्तता करुन घेतली जाते. यामुळे लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा जिल्हास्तरीय उपक्रम माहे जून 2023 रोजीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे संभाव्य नियोजन आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांची गतिमान अंमलबजावणी करुन सर्वसामान्यांना थेट लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच शासन व प्रशासन यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केला जात आहे. तसेच जिथे गरज तिथे मदत अथवा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन गतीमान झालेले आहे. विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना अवगत असतेच असे नाही, तर अशा शेवटच्या घटकांतील लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या अभियानात सहभागी होवून आपल्या दारापर्यंत आलेल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.