विनायक जितकर
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यास यश…
गारगोटी – भुदरगड तालुक्यातील फणसवाडी येथे मागासवर्गीय मुलां – मुलींकरीता शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी १७ कोटी ५ लाख या प्रमाणे ३४ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतीगृह निर्माण होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
मागासवर्गीय एकून २०० मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मागसवर्गीय समाजातील युवक-युवती गारगोटी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना राहण्यासाठी चांगल्या पध्दतीची सोय नसल्यामुळे त्यांची अडचण होत होती.
विद्यार्थ्यांच्या सोईकरीता शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मिळावा याकरीता गेली ५ ते ७ वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. २१ जुलै २०२३ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी १७ कोटी ४ लाख याप्रमाणे ३४ कोटी १० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. |
या निधीतून गारगोटी (फणसवाडी) येथे बांधण्यात येणारी वसतीगृहे ही सर्व सुविधांनी युक्त, मुला- मुलींसाठी सुरक्षीत अशा पध्दतीने बांधण्यात येणार आहेत. भुदरगड तालुक्याच्या शैक्षणिक कार्यात ही वसतीगृहे महत्वपुर्ण ठरणार असून मागसवर्गीय समाजातील मुला-मुलींच्या तसेच खुल्या प्रवर्गातील मुलां-मुलींच्या उच्च शिक्षणाला यामुळे मोठी चालणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या दोन्ही वसतीगृहांच्या बांधकामाची सुरवात लवकरच करण्यात येणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.