सीएसआरच्या माध्यमातून उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे
कोल्हापूर – राज्य शासन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये उद्योजकतांनीही सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) च्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान द्यावे. जिल्ह्यातील विविध उद्योग, कंपन्या यांचा सीएसआर फंड जिल्ह्यातील प्राधान्यक्रम बाबींसाठी जिल्ह्यातच उपयोगात यावा, असे आग्रही प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या समवेत सीएसआर निधी उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रातांधिकारी मौसमी चौगुले, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, यावर्षी सीएसआर च्या माध्यमातून अंगणवाडी, शाळा, क्रीडागंणे यांचा विकास हा प्रमुख उद्देश आहे. उद्योग जगताने कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, आरोग्य, शिक्षण या प्राध्यानक्रमांच्या विषयांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून भरीव योगदान द्यावे. सीएसआरचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातच प्राधान्याने व्हावा, यासाठी सीएसआरसाठी जिल्हास्तरावर समन्वयक कक्ष स्थापन केला जाईल. त्यामध्ये जिल्ह्यासाठी असणाऱ्या प्राधान्य विषयांची सूची ठरविली जाईल. त्यानुसार आपल्या आवडीचे विषय निवडून त्यामध्ये योगदान द्या, असे आवाहनही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
या बैठकीसाठी गोशीमा, स्मॅक यांच्यासह विविध उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी हायवेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, लक्ष्मी टेकडी, मयुर पेट्रोल पंप येथील ट्रॉफीकचा विषय सोडवावा, सेवा रुग्णालयांमध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. उद्योजकांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.











































































