आरोग्याची ग्वाही… २३ आश्रमशाळांतील २५०० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी
कोल्हापूर, :(रुपेश आठवले)
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामाजिक उत्तरदायित्व जपत जिल्ह्यातील २३ आश्रमशाळांमध्ये आणि संबंधित कार्यालयांमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २ हजार ५०० विद्यार्थ्यांची रक्तगट, हिमोग्लोबिन व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरामध्ये भारती हॉस्पीटल, भारती विद्यापीठ, कोल्हापूर तसेच डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, कदमवाडी यांच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
डॉ. बो. जी. कांबळे, डॉ. वैशाली गायकवाड, पर्यवेक्षक रंजना शिंदे (डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमार्फत) आणि डॉ. गीतांजली भोपळे, डॉ. प्रियांका भोपळे व अपूर्वा पेंढारी (भारती हॉस्पीटलमार्फत) यांनी तपासण्या केल्या.
एकूण ५५ अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग लाभलेला या उपक्रमात सर्वांना मोफत वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन व औषधोपचारही करण्यात आले.
कोल्हापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ येथे कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि महामंडळ कार्यालये सहभागी होती.
उपस्थित मान्यवरांमध्ये सहायक संचालक श्रीमती सुनिता नेर्लीकर, संशोधन अधिकारी संभाजी पोवार, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले, कार्यालय अधीक्षक सचिन पाटील यांचा समावेश होता.
हा उपक्रम म्हणजे समाजातील वंचित घटकांच्या आरोग्यप्रती शासनाची व संस्थांची सामूहिक बांधिलकी आहे. अशा उपक्रमांमुळे आरोग्य साक्षरता वाढण्यास आणि गरजूंपर्यंत सेवा पोहोचण्यास मदत होते.