इतिहासातील सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ; प्रमुख नेत्यांची उपस्थिती पुणे TEAM WATCH : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे आणि विधान परिषदेत या घटकांचे प्रश्न ठामपणे मांडणे, या विषयांवर प्रचाराच्या माध्यमातून भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेणारे नेतृत्व विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा पाठपुरावा करणारे तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्याकडे पाहिले जात आहे. तसेच पदवीधरांच्या आकांक्षा, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या प्रश्नांवर डॉ. स्मिता जाधव प्रभावीपणे काम करतील, तसेच शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी देखिल जास्त वाचली गेली...- सातारा जिल्हा कोअर कमिटी..शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी आपल्या मनोगतात तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकासाला चालना देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देणे, यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राजेश पांडे, शरद लाड, डॉ. प्रशम कोल्हे,धीरज घाटे, निरंजन डावखरे, मंजुषा नागपुरे, भैय्या माने, समित कदम जगदीश मुळीक, हेमंत रासने, निवेदिता एकबोटे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. |




























