वेळंब-नालेवाडी येथील घटना; वैद्यकीय तपासणीत पिल्लू सुस्थितीत असल्याचे स्पष्ट
गुहागर तालुक्यातील वेळंब-नालेवाडी येथे शृंगारतळी-आबलोली मार्गावर रस्त्यालगत बिबट्याचे चार ते पाच महिन्यांचे पिल्लू आढळल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पिल्लाची सुरक्षित सुटका करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पिल्लू सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले.
गुहागर- प्रशांत परब(WATCH TEAM) : तालुक्यातील वेळंब (नालेवाडी) येथे शृंगारतळी-आबलोली मार्गालगत बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याची घटना सोमवारी (ता. २३) घडली. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लाची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर पिल्लाला वनविभागाने ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीत ते सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वेळंब (नालेवाडी) येथील रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू आढळल्याची माहिती बाळकृष्ण ओक यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती बचावकार्यवाही केली. या वेळी पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. जाणवले यांनी पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. हे पिल्लू मादी असून, त्याचे वय अंदाजे चार ते पाच महिने असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. पिल्लाची प्रकृती सुस्थितीत असल्याची माहिती वनविभागाने दिली.
विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनपाल अमित निमकर, वनरक्षक श्री. गायकवाड (रानवी), मांडवकर (अडूर) आणि पवार (आबलोली) यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.
रस्त्यालगत आढळलेल्या या वन्यजीवाला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने सुरक्षित ताब्यात घेतल्याने संभाव्य धोका टळला. वनविभागाच्या या कार्यवाहीचे परिसरातून कौतुक होत आहे.
























