रेशनच्या धान्यात वजनाची कपात? निकृष्ट धान्य वितरणाने लाभार्थी त्रस्त! कासार शिरसीतील गोदामाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
५० किलोच्या पोत्यात पाच किलोपर्यंत तूट असल्याचा दुकानदारांचा संशय
लातूर WATCH TEAM चंद्रशेखर केंगार :- निलंगा ( कासार शिरशी ) :
गरिबांच्या हक्काच्या रेशन धान्याच्या वितरणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी कासार शिरसी परिसरातून समोर येत आहेत. एकीकडे धान्याच्या पोत्यांमध्ये अपेक्षित वजनापेक्षा कमी धान्य मिळत असल्याची रास्त भाव दुकानदारांची तक्रार आहे, तर दुसरीकडे काही गावांमध्ये अळव्या आणि जाळ्या मिश्रित निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक धान्य गोदाम आणि पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कासार शिरसी परिसरातील एकूण ६८ गावांपैकी तब्बल ४७ गावांना येथील धान्य गोदामातून रेशन धान्याचा पुरवठा केला जातो. गोदामात धान्याचा साठा आल्यानंतर रास्त भाव दुकानदारांना वितरण करण्यापूर्वी प्रत्येक पोत्याचे वजन ५० किलो असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक पोत्यांचे वजन ५० किलोपेक्षा कमी असल्याची तक्रार परिसरातील रास्त भाव दुकानदारांकडून करण्यात येत आहे. काही पोत्यांमधून तब्बल पाच किलोपर्यंत धान्य कमी मिळत असल्याचा संशय दुकानदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे धान्य गोदामात आल्यानंतर त्याचे वजन, साठवणूक आणि रास्त भाव दुकानांपर्यंत होणारे वितरण या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकपणे तपासणी होणे गरजेचे आहे. ### लिंबाळा परिसरात निकृष्ट धान्याच्या तक्रारी वजनातील कथित तुटीबरोबरच लिंबाळा परिसरासह काही गावांमध्ये वितरित होणाऱ्या रेशन धान्यात अळव्या आणि जाळ्या आढळत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत.
शासनाकडून गरीब कुटुंबांसाठी मोफत धान्य उपलब्ध करून दिले जात असताना, तेच धान्य निकृष्ट दर्जाचे मिळत असेल तर लाभार्थ्यांनी ते वापरायचे कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेशन धान्य हे गरीब आणि गरजू कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे. अशा परिस्थितीत धान्याच्या वजनात तफावत किंवा गुणवत्तेबाबत तक्रारी निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. धान्याची गुणवत्ता आणि वितरणातील पारदर्शकता राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी! या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. गोदामातील प्रत्यक्ष धान्यसाठ्याचे वजन, रास्त भाव दुकानदारांना दिलेल्या पोत्यांचे वजन, वितरणाच्या नोंदी तसेच धान्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी. गरिबांच्या हक्काच्या धान्यात वजनाची कपात होऊ नये आणि लाभार्थ्यांच्या वाट्याला दर्जेदार धान्यच मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी कासार शिरसी परिसरातील नागरिक आणि लाभार्थ्यांकडून होत आहे. *आता प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष चौकशी करणार का? की लाभार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच होणार? असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
























