|
सामाजिक कार्याचा गौरव – बबनराव पाटणकर यांना राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार*
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगला आनंद मेळावा, मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन*
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
मुंबई -TEAM WATCH : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे ‘ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा-२०२६’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. फेसकॉम आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते सिनियर सिटीझन हेल्थ केअर फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. बबनराव पाटणकर यांचा सन्मान. ज्येष्ठांच्या आरोग्य, समुपदेशन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी गेली अनेक वर्षे अविरत कार्य केल्याबद्दल त्यांना ‘राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान-२०२६’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती अभय ओक सर यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष मा. अरुण गुजराथी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पाटणकर यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रमुख अतिथी मा. अभय ओक यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या धकाधकीच्या काळात आनंदी, निरोगी व सुरक्षित जीवन कसे जगावे, यावर अत्यंत साध्या आणि हृदयस्पर्शी शब्दात मार्गदर्शन केले. कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांचे संरक्षण कसे करावे, याबाबतही त्यांनी मोलाचा सल्ला दिला.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अरुण गुजराथी यांनी ज्येष्ठांसाठी उपयुक्त जीवनशैली, आहार, व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यावर प्रकाश टाकला. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत कुशलपणे संयोजन आणि दिशा दिली.
तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटेश यांनी ‘पार्किन्सन’ या आजारावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले. या आजाराची लक्षणे, उपचार आणि काळजी याबाबत त्यांनी दिलेली माहिती सर्वांसाठी उपयुक्त ठरली.
या सोहळ्यात प्रत्येक पुरस्कारार्थीच्या सामाजिक कार्याची विशेष चित्रफीत दाखवून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.सांस्कृतिक सत्रात ‘नादब्रह्म’ या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. गायिका मुम्बयी फाटक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले शास्त्रीय गायन, विविध वाद्यांचे सादरीकरण, भक्तिगीते आणि महाराष्ट्रीयन लोकगीतांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमास फेसकॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टकाळे, प्रादेशिक अध्यक्ष सुरेश पोटे, सर्व पदाधिकारी, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, सिनियर सिटीझन हेल्थ केअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष महादेव इंगळे, संत सावता माळी मंडळाचे सूर्यकांत थोरात, पोलीस मित्र मंडळाचे मारुती बनकर, कविता डॉट कॉमचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रवींद्र पाटील, वाजेगाव प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन यशवंतराव चव्हाण सेंटरने अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले होते, याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

|