५ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन | “गुरू बिना ज्ञान अधुरा”; गुरू-शिष्याचे नाते असावे अतूट!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
– रमेश कृष्णराव लांजेवार (स्वतंत्र पत्रकार, नागपूर)
जगातील शिक्षकांप्रति आदर, सहयोग आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ५ ऑक्टोबर १९६६ रोजी पॅरिसमधील आंतर-सरकारी परिषदेत “टीचिंग इन फ्रीडम” या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर, १९९४ मध्ये ‘युनेस्को’ने (UNESCO) अधिकृतपणे हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून घोषित केला.
जगात प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करतो. भारतात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला, चीनमध्ये २७ ऑगस्टला, तर रशियामध्ये ५ ऑक्टोबरला हा दिवस साजरा होतो. तारीख कोणतीही असो, यामागचा मुख्य उद्देश शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अतूट नाते अधोरेखित करणे हाच आहे.
ऑफलाईन शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षकांचे योगदान
शिक्षक हा असा चेहरा आहे, जो कोट्यवधी विद्यार्थी घडवून पर्यायाने देश आणि जग घडवतो. कोरोना काळातील दोन वर्षांत संपूर्ण जगातील शिक्षण ऑनलाईन झाले होते. परंतु, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भावनिक अंतर पडले आणि शिक्षणाचा खोळंबा झाला. प्रत्यक्ष (ऑफलाईन) शिक्षणामुळे ज्ञानामध्ये जी भर पडते, ती ऑनलाईन प्रणालीत पडू शकत नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे.
गुरू-शिष्याचे नाते आजचे नसून पुरातन काळापासून चालत आलेले आहे. ऋषी-मुनी, राजे-महाराजे, थोर पुरुष, क्रांतिकारक आणि खेळाडूही गुरूशिवाय तयार होऊ शकत नाहीत. आई-वडिलांमध्येही मुलांच्या दृष्टीने पहिले गुरू-शिष्याचे नाते असते. पूर्वी शिक्षकांना ‘गुरू’ आणि विद्यार्थ्यांना ‘शिष्य’ म्हटले जायचे, आज ‘शिक्षक-विद्यार्थी’ हा शब्द बदलला असला तरी त्यांचे महत्त्व तेच आहे. शिक्षण ही अशी संजीवनी आहे, जी कोणी चोरू शकत नाही आणि ती वयाच्या बंधनाशिवाय अवगत करावी लागते.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आणि वृक्षलागवडीचा संकल्प
सध्याचे बदलते हवामान पाहता, या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून जगातील संपूर्ण शिक्षकांनी पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प करावा. प्राचीन काळी शिक्षण हे वृक्षांच्या सानिध्यात (गुरुकुलात) दिले जात असे. त्यामुळे आज प्रत्येकाच्या आयुष्यासाठी शिक्षकांप्रमाणेच वृक्षांशीही नाते घट्ट करणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे ‘शिक्षकांविना ज्ञान नाही’, त्याचप्रमाणे ‘वृक्षांविना ही सृष्टी नाही’. म्हणूनच, ५ ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे आणि संपूर्ण पृथ्वी हिरवीगार करावी, हीच या दिनाची खरी भेट ठरेल. संपूर्ण शिक्षक वर्गाला आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.