|
आजघडीला महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतात सुद्धा जातीव्यवस्था आधारित आरक्षणाबाबत अनेक मोर्चे, संघर्ष घडताना दिसत आहे . मात्र या संघर्षामध्ये आरक्षणाबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत आजचे समाजमानस विशेषतः युवा वर्ग संभ्रमावस्थेत आहे. नेमकी हीच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आरक्षणाबाबत स्पष्ट मत व परखड भाष्य जयंती २ या चित्रपटात केलेले आहे.
![]() |
![]() |
चित्रपटाची कथा पायल या आरक्षण मिळालेल्या कॉलेज विद्यार्थिनीपासून सुरू होते . शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व शेतात राबलेल्या कष्टकरी जिद्दी मुलीला शहरामधील कॉलेजच्या वर्गामध्ये काही मुली तिच्या विशिष्ट जातीमुळे वारंवार नाहक त्रास देतात. सुरुवातीला फक्त पहिल्या बेंचवर बसण्याचा क्षुल्लक कारणांवरून या संघर्षाची ठिणगी पेटते. मात्र कॉलेज व्यवस्थापन तसेच तथाकथित संस्कृती रक्षक यांच्या दबावामुळे तिला कॉलेजमधून निलंबित केले जाते .यामुळे पायल ही शहरातील ‘माणसातील पशु ‘चा अन्याय सोसण्यापेक्षा तिच्या गावातील ‘पशु मधील माणुसकी ‘ बरी यासाठी ती तिच्या मुळगावी परतण्याचा निर्णय घेते. मात्र तिच्या या निमुटपणे जाण्यामुळे कॉलेजमध्ये अनेक जण व्यथित होतात. तिची वैयक्तिक वेदना ही कॉलेजची, संपूर्ण समाजाची अनेक वर्षापासून सहन केलेली वेदना बनून राहते व तिला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या व्यापक संघर्षाची ही कथा आहे.
मात्र या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संघर्ष दाखवताना दिग्दर्शकाने अत्यंत कुशलतेने प्रेक्षकांची संवाद साधलेला आहे. संपूर्ण चित्रपटांमध्ये कोणत्याही जाती धर्माचे एकदाही नाव न घेता फक्त ‘माणूसकी ‘ या धर्माचे समर्थन करताना हा संघर्ष अत्यंत संवेदनशील पणे हाताळला आहे कोणत्याही समाजाबद्दल द्वेष किंवा असूया न धरता संविधानात अभिप्रेत समता ,सामाजिक न्याय आजच्या घडीला कसे आवश्यक आहे हे अत्यंत रंजकतेने सांगितले आहे. कारण चित्रपटाचा मूळ हेतू हाच मुळी सामाजिक न्याय असल्यामुळे त्याकरिता कुठलाही हिंसेचा मार्ग अथवा अति टोकाच्या द्वेषाचा अभिनिवेश न बाळगता दिग्दर्शक श्री शैलेश नरवाडे यांनी एखाद्या निष्णात वैद्याप्रमाणे साखरेचे लेप असलेली कडू गोळीचे औषध देऊन मूळ आजार बरा करण्याकरिता उपाय देखील सांगितला आहे.
चित्रपटामध्ये तथाकथित संस्कृती रक्षक तसेच सामाजिक न्याय ची मागणी करणारे विद्यार्थी यांच्यातील वादविवाद सामना म्हणजे या चित्रपटातील कळस अध्याय होय. त्याचप्रमाणे कॉलेजमधील पीटीच्या मास्तरांनी आरक्षणाचा हेतू समजून सांगताना अडथळ्याची व विनाअडथळ्याची स्पर्धा यातील फरक खूपच रंजकतीने व सोप्या भाषेत सांगितला आहे. समान भाकरीचे वाटप, तसेच तथाकथित संस्कृती रक्षक म्हणून घेणाऱ्यांचे अनुयायांना जेव्हा त्यांच्या नेत्याचे वास्तव कळते तेव्हा भ्रमनिरास होऊन आपण या संस्कृतीच्या रक्षणाचे पोकळ ढोल बडवणारे व बळी ठरणारे अनुयायी ठरतो याचे छान चित्रण केले आहे.
चित्रपटात रितुराज वानखेडे ,प्रियदर्शनी इंदलकर ,पायल जाधव ,रोहिणी हट्टगंडी ,देविका दफ्तरदार , विजय निकम या सर्वच कलाकारांनी चोख भूमिका केलेली आहे . मात्र सर्वांमध्ये प्रियदर्शनी इंदलकर हिने तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस भूमिकेला छेद देत बंडखोर , तडफदार विद्यार्थीनी छान केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात जसे काला , जयभिम , थंगालान यासारखे मोठ्या संख्येने जातीव्यवस्थेवर भाष्य करताना दिसतात व ते लोकप्रियही झाले आहेत . याच पठडीतील जयंती 2 हा चित्रपट देखील समाजव्यवस्थेवर भाष्य करत मनोरंजन सोबत प्रबोधनाचेही धडे देतो . या चित्रपटाचे अनेक भाषेत डबिंग केल्यास तो मोठ्या जनमानसापर्यंत पोहचू शकेल. एकूणच आरक्षण चे समर्थक व विरोधक या सर्वांनी सहकुटुंब बघावा असा नितांतसुदर अभ्यासू चित्रपट बनला आहे .
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































