इचलकरंजी महानगरपालिका मध्ये स्वच्छतेसाठी तातडीची मोहीम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महापौर उदय धातुंडे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

इचलकरंजी – शहरातील वाढत्या कचरा समस्येवर आळा घालण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारताच स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य देत तातडीने कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांच्या दालनात संबंधित विभाग प्रमुख, स्वच्छता अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक घेण्यात आली.

बैठकीत कचरा उठावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एनडीके कंपनी च्या अधिकाऱ्यांना दररोज नियमित कचरा उचलण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. “इचलकरंजी शहर पुढील १५ दिवसांत कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदारांनी जबाबदारीने काम करावे. वेळकाढूपणा किंवा हयगय सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला. शहरातील डंपिंग पॉइंटची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. लहान गल्ल्या, गटारे आणि कोपऱ्यांत साचलेला कचरा त्वरित ट्रॅक्टर-ट्रॉली किंवा टेम्पोद्वारे डेपोपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले असून कामात कसूर झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्व ६५ नगरसेवकांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घंटागाडीमध्येच कचरा टाकावा यासाठी विशेष अभियान हाती घेतले जाणार आहे. यासाठी लालनगर परिसरात प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येणार असून स्वच्छता निरीक्षक घंटागाडी वेळेवर येते की नाही याची नियमित पाहणी करतील. महापौर धातुंडे यांनी स्वतःच्या प्रभागातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासन, नगरसेवक आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून ‘स्वच्छ इचलकरंजी’चा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.