कोल्हापूर, गडहिंग्लज येथे कार्डियाक कॅथलॅबला मंजुरी – आरोग्य मंत्री आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चार जिल्ह्यांसाठी १०० कोटी…

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूरसह राज्यातील पुणे, जालना, गडचिरोली या चार जिल्हयांमध्ये कार्डियाक कॅटलॅब उभारणीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून त्यासाठी ९९ कोटी ८५ लाख ८९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी सेवा रूग्णालय तसेच गडहिंग्लज येथील सर्वोपचार रुग्णालयात टी-के बेसिसवर अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब उभारण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.राज्यात हृदयविकार व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गडहिंग्लज तसेच कोल्हापूर शहरातील सेवा रूग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या तपासण्या व उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे हलवावे लागत होते. त्यामुळे रुग्णांच्या उपचारात विलंब होण्याबरोबरच आर्थिक भार आणि मानसिक तणावही मोठ्या प्रमाणात वाढत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील पुणे, जालना, गडचिरोली आणि कोल्हापूर या चार जिल्हा रुग्णालयांमध्ये टी-के बेसिसवर कार्डियाक कॅथलॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी ईपीसी पद्धतीने करण्यात येणार असून, यामध्ये कॅथलॅब उभारणीसाठी आवश्यक असलेली संरचनात्मक रचना, यांत्रिकी-विद्युत-प्लंबिंग आराखडे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, त्यांची उभारणी, चाचणी, साठवण, वितरण तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश राहणार आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार असून, उपकरणांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार प्री-डिस्पॅच आणि पोस्ट-डिस्पॅच रँडम सॅम्पल तपासणी केली जाणार आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कार्डियाक कॅथलॅबमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे तातडीने शोधणे व त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होणार असून, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार उपलब्ध झाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. सी.पी.आर. रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व आधुनिक होणार असून, सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्यल्प खर्चात उच्च दर्जाचे हृदयविकार उपचार मिळणार आहेत.

हृदयविकार रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय…

राज्यात हृदयविकार व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना वेळेवर निदान व उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत कार्डियाक कॅथलॅबसाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक, शारीरिक व वेळेचा मोठा ताण रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांवर पडत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कोल्हापूरसह पुणे, जालना आणि गडचिरोली या चार जिल्हा रुग्णालयांमध्ये कार्डियाक कॅथलॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

वेळेवर उपचार, जीव वाचविण्यास मदत…

कार्डियाक कॅथलॅबमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या तपासण्या व उपचार तातडीने करता येणार आहेत. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ‘गोल्डनअवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या सुविधेमुळे वेळेत उपचार मिळून अशावेळी अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.