मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या मार्गाला तत्काळ स्थगिती देऊन महामार्गाची मार्गीका बदलण्याची मागणी…
गारगोटी प्रतिनिधी – राज्य शासनाने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे नियोजित केले असून या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा या दोन्ही तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला होता. आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री संत बाळूमामा देवस्थान आदमापुरचा ही समावेश भक्तिमार्गामध्ये करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने बाळूमामा देवस्थान चाही समावेश या भक्तिमार्गामध्ये करण्यात आला. परंतु कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्र या भक्तीमार्गामध्ये संपादित करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. याबाबत भुदरगड तालुक्यातील म्हसवे, वाघापूर , मडिलगे खुर्द, आकुर्डे सह तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गामुळे आपली शेती संपादित होणार असून आम्ही भूमी हीन होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
या अनुषंगाने माजी खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या मार्गाला तत्काळ स्थगिती देऊन महामार्गाची मार्गीका बदलण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. त्यानुसार एमएसआरडीसी कडून प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मुख्यमंत्री महोदयानी दिलेल्या आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम व असंतोष हा महामार्ग रद्द करून दूर होणार आहे. असे आमदार आबिटकर यांनी सांगितले आहे.
















































































