विनायक जितकर
गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वेचे नूतनीकरण सुरू… कोल्हापूर स्थानकाचा होणार कायापालट…
कोल्हापूर – पुणे डिव्हिजनल रेल मॅनेजर इंदुमती दुबे यांनी आज कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू टर्मिनलसची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही अधिकारी, कर्मचारी वर्गाची देखील झाडाझडती करत, सुरू असलेल्या कामासंदर्भात योग्य त्या सूचना देत, लोकांच्या तसेच प्रवासी वर्गाच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा सूचक इशारा ही आजच्या कोल्हापूर पाहणी दौऱ्यात इंदुमती दुबे यांनी दिला.
कोल्हापूर येथे अनेकदा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा हा नियोजित असतो की नाही, यासंबंधीची माहिती जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून प्राप्त होत नाही. की कोल्हापूर च्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्याचे नियोजन व पाहणी असा दौरा ठरलेला असतो की काय, रविवार सुट्टी असूनही वरिष्ठ अधिकारी आल्याने ही दबक्या आवाजात रेल्वे स्थानकात चर्चा सुरू होती.
पुण्याच्या डिव्हिजनल रेल मॅनेजर इंदुमती दुबे यांनी श्री छत्रपती शाहू टर्मिनलसची 4 तासाच्या दौऱ्यात पाहणी केली. कोल्हापूर येथे गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वेचे नूतनीकरण सुरू आहे. स्थानकाचा कायापालट आणि प्लॅटफॉर्म चे दुहेरीकरण चे काम गतीने करा, त्यावर योग्य ती देखरेख करा अशा सूचना दुबे यांनी दिल्या. या भेटी दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना चे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी देखील भेट घेत, महालक्ष्मी रेल्वे ला जादा दोन डबे जोडावेत, एसी डब्यात अनेक गैरसोयी असून, आवश्यक त्या सुविधांचा प्रवाशांना अभाव आहे तो दूर करावा, तसेच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विशेष रेल्वे सोडावी अशी मागणी शिवनाथ बियाणी यांनी केली.
स्थानक दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टॉयलेट, वॉशरूमची गैरसोय होत असल्याचे प्रवाशांनी लक्ष वेधले असता, ठेकेदारांना सूचना करू असे इंदुमती दुबे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सकाळच्या भेटीत काही अधिकारी, कर्मचारी, तिकीट बुकिंग कर्मचारी यांना फैलावर घेत, कामात चुकारपणा नको, कर्तव्याचे पालन करा, पुन्हा तक्रारीचा पाढा समोर येता कामा नये असे सांगितले.