दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. 8 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अवकाळीचे ढग दूर होतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. विजा आणि मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा आहे. |
---|
दरम्यान, रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक महाराष्ट्र व्यापल्याचे चित्र आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.