राज्यात एकूण 22 हजार 593 गावात ही मोहीम स्वरुपात राबवून अंमलबजावणी करण्यात आली.
कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान 2.0 सदस्य सचिव यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-1 सन 2015-16 ते 2018-19 मध्ये आपल्या गावामध्ये कामे पूर्ण करण्यात आली असतील व त्या कामांना दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल, तर आपल्या गावाचा समावेश जलयुक्त शिवार टप्पा 2.0 अभियानांतर्गत होण्याबाबत ग्रामसभेचा ठराव करावयाचा आहे. तसेच गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तालुकास्तरीय जलयुक्त शिवार 2.0 समिती अध्यक्ष (उपविभागीय अधिकारी/प्रांत) अथवा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग कोल्हापूर या कार्यालयास सादर करावा.
जलयुक्त शिवार अभियान -1 सन 2015-16 ते सन 2018-19 पर्यंत राबविण्यात आले. विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेण्यात आली. राज्यात एकूण 22 हजार 593 गावात ही मोहीम स्वरुपात राबवून अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली असून 20 हजार 544 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. अभियानाअंतर्गत झालेल्या कामामुळे जवळपास 27 लाख टी सी एम पाणीसाठा क्षमता निर्माण होऊन 39 लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माणहोऊन कृषी उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणण्यात आली. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा -1 सन 2015-16 ते 2018-19 पर्यंत राबविण्यात आला आहे. त्याची फलनिष्पत्ती चांगली झाल्याने शासनाने जलयुक्त शिवार टप्पा 2.0 राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा 1 राबविण्यात आलेल्या गावामध्ये झालेल्या उपाययोजनांचा कार्यक्षम वापर होण्याकरीता व त्यातील पाण्याची संरचना पुनःस्थापित करण्याकरीता, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या उपाय योजनांची देखभाल दुरुस्ती, परिरक्षण व क्षमता पुनर्स्थापित करणे या बाबींचा समावेश जलयुक्तशिवार अभियान टप्पा 2 मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
जलयुक्त शिवार टप्पा-१ मधील पूर्ण झालेली पुढील कामे कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांध, सलग समतलचर, खोल सलग समतल चर, मजगी, अनघड दगडी बांध, शेततळे, शेत बांध दुरुस्ती, जुनी भात शेती बांध दुरुस्ती, जुन्या बोड़ीचे नुतनीकरण, खोलीकरण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, अर्थन स्ट्रक्चर, वळण बंधारा, रिचार्ज शाफ्ट, गॅबियन बंधारा, इत्यादी कामे प्रस्तावित करता येतील. तसेच लोकसहभागातून ओढे, नदी, नाले अतिक्रमण मुक्त करुन खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम प्रस्तावित करता येईल, असे पत्रकात म्हटले आहे.