पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 31 मे रोजी महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार…
कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरीता ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या इच्छुक महिलांनी आपला कार्य अहवाल, वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशीलासह अर्ज स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे दि. 20 मे 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम (प्रति महिला 500 रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप असून हा खर्च ग्रामपंचायतीने त्यांच्या महिला व बाल विकास साठीच्या 10 टक्के निधीतून करावयाचा आहे. पुरस्कार हा दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी प्रदान करण्यात येईल. इच्छुक महिलेने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य केलेले असावे. बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या सामाजिक कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.
यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची समिती गठीत करण्यात येणार आहे, असेही महिला व बाल विकास विभागामार्फत कळविण्यात आले आहे.